नाशिक : पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब सानप यांच्या उमेदवारीबाबत अनिश्चितता असतानाच या मतदारसंघातील अनेक विद्यमान नगरसेवक तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या उमेदवारीला हरकत घेऊन कडाडून विरोध केला आहे. सानप यांना उमेदवारी देऊ नये यासाठी पक्षातील पदाधिकाऱ्यांनी औरंगाबाद रोडवरील एका हॉटेलात सोमवारी (दि. ३०) मेळावा घेत विरोध प्रगट केला.बैठकीत सानप यांना उमेदवारी देऊ नये म्हणून येत्या दोन दिवसांत नाराज गट मुंबईला भाजप पदाधिकाºयांची भेट घेणार असून, अन्य दुसरा कोणताही उमेदवार द्या, निवडून आणू, असा निर्धार केल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर संबंधित मुंबईस रवाना झाले.बाळासाहेब सानप यांच्याकडे शहराध्यक्षपददेखील होते. त्यावेळी त्यांनी अनेक पक्ष कार्यकर्त्यांना दुखावल्याची तक्रार आहे. तथापि, आता उमेदवारी घोषणा तोंडावर असताना सोमवारी (दि. ३०) हा मेळावा घेण्यात आला. तब्बल एक ते दीड तास चाललेल्या या मेळाव्यात उपस्थित नगरसेवक व पदाधिकाºयांनी सानप हटाव, असा नारा दिला. सानप यांच्याऐवजी पक्षातून अन्य इच्छुक असलेल्या कोणत्याही उमेदवाराला पूर्व विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास निवडून आणण्याची जबाबदारी आमची राहील, अशा शपथादेखील घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. या बैठकीनंतर वीस लोकप्रतिनिधी व सुमारे सत्तर ते ऐंशी पदाधिकारी मुंबईत भाजप श्रेष्ठींची भेट घेऊन सानप यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविणार असल्याचे ठरविण्यात आल्याचे सांगण्यात आले. सदर बैठकीत सानप विरोधी काही पदाधिकारी एकत्र आल्याने उमेदवारी धोक्यात आली आहे.विशेष म्हणजे मेळाव्यात अनेक भाजप इच्छुकांचा देखील समावेश होता. अर्थात, मुंबईस मंगळवारी जाण्याचे ठरले असले तरी बैठकीनंतरच अनेक जण रवाना झाले.सानप यांचेदेखील मुंबईत शक्तिप्रदर्शन?उमेदवारीस होत असलेला विरोध बघता आमदार सानप यांनीदेखील खेळी करून नगरसेवक आणि नाशिकरोड भागातील महिलांचे शिष्टमंडळ सोमवारी (दि. ३०) मुंबईस नेले होते, असे समजते. मुंबईमध्ये उमेदवारी निश्चितीसाठी भाजपची बैठक होत असताना पूर्व नाशिकमधील अनेक अन्य इच्छुकांनी मुंबईत तळ ठोकला होता.
सानप यांच्या उमेदवारीस भाजपतून विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2019 1:08 AM