नाशिक- महापालिकेत भाजपची सत्ता असतानाही स्थायी समितीचे सभापती विरोधात अन्य पदाधिकारी असा सामना सध्या रंगला आहे. त्याची परिणीती वेगळीच झाली असून स्थायी समितीतील भाजपचे सभापती उध्दव निमसे यांनी या समितीचे भविष्यातील हंगामी सभापती म्हणून मनसेचे अशोक मुर्तडक यांचे नाव जाहिर करून धमाल उडवून दिली.
स्थायी समितीची बैठक सभापती उध्दव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि.२२) समितीची बैठक झाली. यावेळी निमसे यांनी स्थायी समितीच्या सदस्यपदाची निवडणूक ही ३० दिवसात झाली नाही तर ज्येष्ठत्वानुसार हंगामी सभापती निवड करता येते असा दावा निमसे यांनी केला आणि त्या आधारे निवडही घोषीत केली. यावेळी अशोक मुर्तडक यांचा पुष्पगुच्छ देऊन निमसे यांनी सत्कारही केला. पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करूनच हा निर्णय घेतल्याचा दावा निमसे यांनी केला.
महापालिकेच्या स्थायी समितीचे आठ सदस्य नियुक्त करताना पक्षीय तौलनिक बळाच्या नियमांचा भंग करून शिवसेनेचा एक सदस्य कमी नियुक्त केल्याने शिवसेनेने शासनाच्या नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. त्यानुसार शासनाने २४ फेब्रुवारीस सदस्य निवडीच्या महासभेच्या ठरावास स्थगिती दिली आहे. तर भाजपचे गटनेते जगदीश पाटील यांनी त्यास उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी ३ मार्च रोजी सभापतीपदाची निवड घोषीत केली असली तरी ही निवडणूक होईल किंवा नाही याबाबत शंका आहे. त्यामुळे हीच निवडणूक लांबणीवर पडण्याची शक्यता गृडीत धरून निमसे यांनी ही खेळी केली आहे.