नाशिक : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यातील सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने मन मोठे करून शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन सत्तेत सहभागी व्हावे व पुन्हा एकदा या दोन्ही पक्षांनी एकत्र यावे, असे मत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी सोमवारी नाशिक येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केले.
लाेककवी विनायक पठारे यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले सोमवारी नाशिक दौऱ्यावर आले होते. ते म्हणाले, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये आरपीआय भाजपसोबत राहणार असून, उत्तर प्रदेशात बसपाचा जनाधार कमी झाला आहे. तेथे आमच्या पक्षाला संधी असल्यामुळे आम्ही काही जागांवर निवडणूक लढविणार आहोत. भाजपने रिपाइंला ८ ते १० जागा द्याव्यात यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी राहत नसल्याने शिवसेनेतील इतर कुणाला तरी मुख्यमंत्रिपद द्यावे, असे वातावरण सेनेतही आहे. इतर कुणाला मुख्यमंत्री करण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्रिपद देऊन दोन्ही पक्षांनी अडीच-अडीच वर्षांचा कार्यकाळ वाटून घ्यावा किंवा भाजपने मोठे मन करून शिवसेनेला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देऊन स्वत:कडे उपमुख्यमंत्रिपद घेत सत्तेत सहभागी व्हावे, असा सल्ला त्यांनी दिला.
दलित पँथरचे पुनरुज्जीवन करण्याचा विचार
९ जुलै २०२२ ला दलित पँथरच्या स्थापनेला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. १९९० मध्ये रिपाइं ऐक्यासाठी आम्ही दलित पँथरचे विसर्जन केले होते. बदलत्या काळात पँथरचे पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचा गांभीर्याने विचार करीत असल्याचे आठवले यांनी सांगितले.