नाशिक : अनंत कान्हेरे मैदानावर शिवजयंतीनिमित्त केवळ मानवंदना देण्यास परवानगी दिलेली असताना व मिरवणूक न काढण्याबाबत पोलिसांनी नोटीस बजावलेली असतानाही या आदेशाचा भंग करून मिरवणूक काढणारे भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, शिक्षक आमदार अपूर्व हिरे यांच्यासह हिंदू संघटनाच्या कार्यकर्त्यांविरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिवजयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, आमदार अपूर्व हिरे, करण गायकर, सुरेश बाबा पाटील, चंद्रकांत बनकर, शिवाजी सहाणे यांना अनंत कान्हेरे मैदानावर केवळ शिवरायांना मानवंदना देण्यासाठीची परवानगी देण्यात आली होती़ मात्र, या समितीच्या पदाधिकाºयांनी केवळ मानवंदना न देता शिवजयंती मिरवणुकीच्या पारंपारीक मार्गात परस्पर बदल करून मेळावा घेत अनंत कान्हेरे मैदान- सीबीएस- पंचवटी कारंजा यामार्गे मिरवणूक काढली होती़
पोलीस आयुक्तालयात शिवजयंती सोहळ्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या शांतता समिती बैठकीत पोलिस आयुक्त रविंद्र सिंगल यांनी नवीन मिरवणूक मार्गास विरोध दर्शवित यासाठी शासन स्तरावरून परवानगी घ्यावी लागणार असल्याचे सुचित केले होते. तसेच या नवीन मार्गावरून मिरवणूक काढू नये यासाठी संबंधितांना १४९ प्रमाणे नोटीसा बजावण्यात आल्या होत्या़ मात्र, या आदेशास न जुमानता शिवजन्मोत्सव सोहळा समितीने मिरवणुक काढली़
या प्रकरणी पोलीस शिपाई एकनाथ राठोड यांच्या फिर्यादीवरून मुंबई नाका पोलिसांनी समितीचे नेते व कार्यकर्त्यांविरोधात जमाव व शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला़