नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल झाला आणि रद्दही झाला; मात्र त्यामुळे भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर आली असून, एका गटाने याबाबत पक्षश्रेष्ठींकडे केलेल्या तक्रारींमुळेच हा प्रस्ताव मागे घेण्याची नामुष्की घेण्यात आल्याची चर्चा आहे. महापालिकेत भाजपाचे ६६ नगरसेवक असून, स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच इतके मोठे बहुमत प्राप्त झाले आहे; मात्र त्याचा वापर करण्याऐवजी भाजपाला गटबाजीने ग्रासले आहे. महापालिका नक्की कोणाच्या ताब्यात या वर्चस्ववादातून ती अधिक वाढत असून, एक दुसऱ्याला नामोहरम करण्यासाठी कोणत्याही स्तरावर जाण्यास हे गट मागे पुढे पाहत नाही. या वादातूनच महापालिकेवर अंकुश ठेवणाºया गटाची कोंडी करण्यासाठी खास तुकाराम मुंढे यांची नाशिकमध्ये नियुक्ती करून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. महापालिकेत अनेक खास विषय मार्गी लावण्यासाठी काही मोजक्या आणि अन्य पक्षातून भाजपात काम करणाºयांना पुढे केले जाते आणि त्यातून काही वाद निर्माण झाले की, संबंधितांवर खापर फोडले जाते, त्यामुळे अनेकदा गटबाजी वाढण्यास हेच कारणीभूत ठरते. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी सभागृहनेते दिनकर पाटील यांनी पुढाकार घेतला असला तरी मुळातच त्यामागे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी असल्याचे दिनकर पाटील यांनी जाहिररीत्या पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले होते. साहजिकच त्यांच्या विरोधी गटात मानल्या जाणाºया आमदार देवयानी फरांदे यांनी उचल घेतल्याचे सांगितले जात असले तरी त्यात बरोबर स्थायी समितीच्या सदस्यांच्या विशेषाधिकारात सभेची मागणी करण्यास नकार देणाºया समितीच्या सभापती हिमगौरी आडके यांची भूमिका देखील खूपच निर्णायक मानली जाते. महापालिकेतील प्रस्थापितांना न जुमानता त्यांनी हे धाडस केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी यासंदर्भात संपूर्ण माहिती पुरविण्यात आली होती. यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी करवाढ रद्दसाठी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर जबाबदारी सोपवली असतानादेखील परस्पर विशेष सभा घेण्याचा प्रकार पालकमंत्र्यांना न जुमानणारा होता, त्याच धर्तीवर अविश्वास ठरावाचेदेखील घडल्याने त्याबाबत उभय पक्षश्रेष्ठी नाराज झाले होते. पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी नाशिकमधील भाजपा शहाणी झाली त्यांना मदतीची गरज नाही तेच स्वत:च निर्णय घेत असल्याचे सांगून नाराजी प्रकट केली होती असे समजते. त्यामुळे अविश्वास ठराव बारगळणे तेव्हाच स्पष्ट झाले होते.सभागृह नेता दुसºयांदा अडचणीतमहापालिकेच्या अविश्वास ठराव प्रकरणात पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकच्या भाजपाने आततायीपणा केल्याचे मुंबईत म्हटले होते. त्यावेळी सदरचे अविश्वास ठराव मांडण्याचे आदेश हे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि महापौर रंजना भानसी यांनी दिल्याचे पत्र दिनकर पाटील यांनी गुरुवारीच सोशल मीडियावर व्हायरल केले होते. आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना नवे पत्र पाठविले असून, त्यात आपली भूमिका पुन्हा मांडली आहे. त्यात सानप आणि महापौरांनीच आदेश दिल्याचा पुनरुच्चार केला आहे. यापूर्वी पालकमंत्र्याकडे करवाढीचा निर्णय प्रलंबित असताना गेल्या महिन्यात विशेष महासभा घेण्यात आली, त्यावेळी पालकमंत्र्यांनी निर्णय घेतला नसताना सभा बोलावून करवाढ रद्दचा निर्णय कसा काय घेतला गेला? असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हाही पाटील यांनी विशेष महासभा बोलविण्याची सूचना शहराध्यक्षांनी केली असे पत्र व्हायरल केले होते.पक्षाची भूमिका नव्हती म्हणूनआयुक्त तुकाराम मुंढे यांच्यावरील अविश्वास प्रस्तावाबाबत विशेष महासभा घेण्याची मागणी करण्याच्या पत्रावर स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके यांची सही नव्हती. याबाबत शुक्रवारी (दि. ३१) पत्रकारांनी त्यांना विचारले असता भाजपात कोणताही निर्णय हा बैठक घेऊन घेतला जातो. मुंढे यांच्यासंदर्भात सभा बोलविण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींकडून अधिकृतरीत्या आपल्याकडे आला नव्हता. त्यामुळे स्वाक्षरी केली नसल्याचे स्पष्ट केले.
अविश्वासावरून भाजपातील गटबाजी चव्हाट्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:36 AM