भाजपला हवा ठाकरेंचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 11:36 PM2021-07-17T23:36:52+5:302021-07-18T00:08:07+5:30

मतदारांना दुखावून भाजप मनसेशी युती करणार नाही. परंतु, मराठी मतदारांमध्ये सहानुभूतीसाठी कोणीतरी एक ठाकरे सोबत राहू द्यावा, असा भाजपचा प्रयत्न असेल.

BJP wants Thackeray's support | भाजपला हवा ठाकरेंचा आधार

भाजपला हवा ठाकरेंचा आधार

Next
ठळक मुद्देशिवसेनेचे प्राबल्य असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ही राजकीय हवा तयार केली जात आहे.महाविकास आघाडीत चलबिचल राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे.

मिलिंद कुलकर्णी
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिक मुक्कामी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावनांचे राजकीय अर्थ निघणार आहेत. राज ठाकरे यांचे नेतृत्व महाराष्ट्राला हवे आहे, या विधानातून त्यांनी राज यांना गोंजारले असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही चिमटा काढला आहे. पाटील यांच्या विधानावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया आलेली नसली तरी आता ते पत्ते खुले करणार नाहीत, हेही तेवढेच खरे आहे. नाशिक मुक्कामी असल्याने केवळ नाशिक महापालिकेविषयी भूमिका घेण्याचा विषय नसून मुख्यत: शिवसेनेचे प्राबल्य असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून ही राजकीय हवा तयार केली जात आहे. दहा वर्षांपूर्वी नाशिककरांनी मनसेला साथ देऊन महापालिकेत सत्ता दिली. भाजपने शिवसेनेसोबत राज्यात युती असूनही नाशकातील सेनेची ताकद कमी करण्यासाठी मनसेला पाठिंबा दिला होता. राज्यात सत्ता येताच त्याच मनसेकडून भाजपने सत्ता खेचून घेतली. विधानसभा निवडणुकीतदेखील प्रभाव दाखविला. मात्र, मनसेप्रमाणे भाजपकडूनही नाशिककरांचा भ्रमनिरास होऊ लागल्याने भाजपने आता राज ठाकरे यांना जवळ घेण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नाशिकमध्ये मनसेची ताकद कमी झालेली असली तरी राज व अमित ठाकरे यांचा करिष्मा कायम आहे. नाशिकसोबतच मुंबई, औरंगाबाद येथे तो कामी येईल, असा भाजपचा होरा दिसतोय. परप्रांतीयांचा मुद्दा उपस्थित करण्याचे कारण म्हणजे मुंबईत भाजपचा मतदारवर्ग हा परप्रांतीयांमध्ये अधिक आहे. गेल्या महापालिका निवडणुकीत याच मतदारांनी भाजपला भरभरून साथ दिली होती. सेनेला नाकीनऊ केले होते. आता काँग्रेस नेते कृपाशंकर सिंग यांनी नुकताच भाजपमध्ये केलेला प्रवेश ही निवडणूक तयारीची एक पायरी आहे. त्या मतदारांना दुखावून भाजप मनसेशी जाहीरपणे युती करणार नाही. परंतु, मराठी मतदारांमध्ये सहानुभूती कायम राखण्यासाठी कोणीतरी एक ठाकरे सोबत राहू द्यावा, असा भाजपचा प्रयत्न राहणार आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्यापूर्वी राज ठाकरे यांनी त्यांच्या गुजरातला भेट देऊन विकास मॉडेलचे केलेले कौतुक आणि मोदीच पंतप्रधान व्हावेत, असे केलेले विधान आणि नंतर तेच मोदी पंतप्रधान झाल्यावर केलेली प्रचंड टीका भाजप आणि मतदार विसरलेले नाहीत. भूमिका बदलत राहिल्याचा राजकीय फटका त्यांना सर्वच निवडणुकांमध्ये बसला.

महाविकास आघाडीत चलबिचल
राज्यातील महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने ह्यएकला चलो रेह्णच्या घेतलेल्या भूमिकेने चलबिचल सुरू झाली आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आणि शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट यामुळे राजकीय वातावरण पुन्हा ढवळून निघाले आहे. नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत घेतलेली भेट आणि गेल्या आठवड्यात नाशिक महापालिकेच्या बससेवा उद्घाटन कार्यक्रमात नगरविकास मंत्री व सेना नेते एकनाथ शिंदे आभासी पद्धतीने सहभागी झाले असले तरी छगन भुजबळ यांनी प्रत्यक्ष हजेरी लावली. या घडामोडींचे राजकीय अर्थ निश्चित काढले जात आहेत. पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रावर चर्चा करण्यासाठी झालेली भेट हे पवारांनी दिलेले स्पष्टीकरण असो की, ओबीसींविषयीची माहिती केंद्र सरकारकडून मिळविण्यासाठी शिष्टमंडळाचे नेतृत्व करावे, असे फडणवीसांना सांगितल्याचे भुजबळांचे प्रतिपादन असो, राजकीय भेटींमागील अर्थ काही दिवसांनी समोर येतोच. या भेटींचा परिणाम दिल्ली, मुंबईप्रमाणे स्थानिक पातळीवरदेखील होतो. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवकदेखील सावध पवित्रा घेत आहेत. भाजपने पाच वर्षांपूर्वी सत्तेसाठी सर्वपक्षीय नगरसेवकांना सामावून घेतले होते. मूळ घरटे साद घालू लागल्याने भाजप नगरसेवकांमध्ये खदखद जाणवू लागली आहे. फडणवीस आले असताना काही नगरसेवकांना भेटता आले नाही, म्हणून नाराजी होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना भेटण्यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात महापौर नव्हते. अशा कुरबुरी पाहता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना तातडीने नाशिकला यावे लागले. त्यांच्या या मोहिमेला कितपत यश येते, हे लवकरच कळेल. भाजपप्रमाणे मनसेचीही तीच स्थिती आहे. ताकद कमी होत असतानाही गटबाजी आहे. राज आणि अमित ठाकरे यांनी ती कमी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. शिवसेनेत संजय राऊत यांचा शब्द नाशिकविषयी अंतिम मानला जातो. पण त्यांनी गठीत केलेल्या पाच सदस्यीय समितीला अंतर्गत विरोध आहे. राष्ट्रवादीत भुजबळ सांगतील, ती पूर्वदिशा राहील. काँग्रेसची अवस्था बिकट असताना स्वबळावर कसे लढावे हा त्यांच्यापुढे पेच आहे. सगळे पक्ष अशा वातावरणातून मार्ग काढण्यासाठी शिकस्त करीत आहेत.
 

Web Title: BJP wants Thackeray's support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.