नाशिक : जिल्ह्यातील सात नगरपंचायती निवडणुकांसाठी राजकीय हालचाली गतिमान झाल्या असून, शिवसेना वगळता राष्ट्रवादी, कॉंग्रेस व भारतीय जनता पक्षाने प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन निवडणूकपूर्व आढावा घेण्याबरोबरच संभाव्य लढतीची तयारी केली आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यता असून, भाजपने मात्र स्वतंत्र लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी प्रत्येक पक्षाने निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. डिसेंबर महिन्यात चांदवड, देवळा, कळवण, पेठ, सुरगाणा, दिंडोरी व निफाड या सात नगरपंचायतींची मुदत संपुष्टात येत असून, गेल्या आठवड्यातच या सातही नगरपंचायतींच्या आरक्षणाची सोडत काढण्यात आली. त्यामुळे येत्या काही दिवसांत निवडणूक कार्यक्रमांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर आत्तापासूनच इच्छुकांनी तयारी सुरू केली आहे. राजकीय पक्षांनीदेखील या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली आहे.
चौकट==
काॅंग्रेसच्या निरीक्षकांची नियुक्ती
या निवडणुकांसाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी निरीक्षकांच्या नेमणुका केल्या आहेत. त्यात रमेश कहांडोळे (निफाड), दिगंबर गिते (चांदवड), भरत टाकेकर (पेठ), किशोर कदम (देवळा), गोपाळ लहांगे (कळवण), धर्मराज जोपळे (सुरगाणा) यांचा समावेश आहे. यासंदर्भात पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी अनुसूचित जाती विभाग अध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, किशोर कदम, धर्मराज जोपळे, ॲड. समीर देशमुख, अशोक शेंडगे, अनिल बहोत, प्रकाश खळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
चौकट==
भाजपच्याही नेमणुका
नगरपंचायती निवडणुकांसाठी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसपाठोपाठ भाजपनेही निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. सातही नगरपंचायतींसाठी भाजप स्वबळावर उमेदवार रिंगणात उतरविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी दिली. निरीक्षकांच्या नेमणुकीत नितीन जाधव (दिंडोरी), डॉ. उमेश काळे (पेठ), गणेश ठाकूर (चांदवड), मनोज दिवटे (निफाड), संजय गाजरे (कळवण), आनंद शिंदे (देवळा) व डॉ. सुनील बच्छाव (सुरगाणा) यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्त निरीक्षकांना त्या-त्या नगरपंचायती क्षेत्रात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठका घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.