भाजपा जिंकला, भाजपा हरला! रिंगणातून काँग्रेसला केले हद्दपार, स्वत:ही मैदानातून काढला पळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2023 12:05 PM2023-01-14T12:05:06+5:302023-01-14T12:05:15+5:30

डॉ. राजेंद्र विखे हे नगर जिल्ह्यातील असल्यामुळे यंदा नगर विरुद्ध नगर अशीच लढत रंगणार, अशी चर्चा भाजपकडूनच पसरविली जात होती.

BJP won, BJP lost! The Congress was expelled from the arena, they themselves ran away from the arena | भाजपा जिंकला, भाजपा हरला! रिंगणातून काँग्रेसला केले हद्दपार, स्वत:ही मैदानातून काढला पळ

भाजपा जिंकला, भाजपा हरला! रिंगणातून काँग्रेसला केले हद्दपार, स्वत:ही मैदानातून काढला पळ

Next

नाशिक : पक्षाने अधिकृत उमेदवारी दिलेली असतानाही डॉ. सुधीर तांबे यांना आमदार होण्यापासून रोखणे, पक्षाने नकार दिलेला असताना सत्यजित तांबे यांना अपक्ष उमेदवारी करण्यास भाग पाडून भारतीय जनता पक्षाने फटक्यासरशी काँग्रेसला आपल्या खेळीने पदवीधर मतदारसंघाच्या मैदानावर चारीमुंड्या चीत केले असले तरी, कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच लढणाऱ्या भाजपने पदवीधर मतदारसंघात पहिल्यांदाच पक्षाचा अधिकृत उमेदवार नाकारून निवडणुकीपूर्वीच स्वत:चीही हार मानली आहे.

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघावर असलेल्या भाजपच्या एकतर्फी वर्चस्वाला डॉ. सुधीर तांबे यांनी पहिल्यांदा अपक्ष व नंतर काँग्रेसकडून उमेदवारी घेत सुरूंग लावल्याने खवळलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत त्याचा वचपा काढल्याचे आता बोलले जात आहे. पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून काँग्रेसकडून अवघे डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची चर्चा होत असताना भाजपकडून मात्र महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू डॉ. राजेंद्र विखे, हेमंत धात्रक, धनराज विसपूते, विखे यांचे समर्थक धनंजय जाधव, शुभांगी पाटील असे अर्धा डझन इच्छूक होते. त्यामुळे  या सर्व इच्छुकांची ताकद एकत्र आल्यास पदवीधर निवडणुकीत भाजपचा विजय सोपा असल्याचे गणितही मांडण्यात येत होते.

डॉ. राजेंद्र विखे हे नगर जिल्ह्यातील असल्यामुळे यंदा नगर विरुद्ध नगर अशीच लढत रंगणार, अशी चर्चा भाजपकडूनच पसरविली जात होती. त्यातच भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेले गिरीष महाजन यांना निवडणूक अधिकारी म्हणून नेमण्यात आल्याने भाजप काँग्रेसच्या ताब्यातून मतदारसंघ हिसकावण्यास यशस्वी होईल,  असे मानले जात होते. मात्र, भाजपने काँग्रेसचे विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या पुत्रालाच उमेदवारी देण्याची चर्चा घडवून आणताना डॉ. तांबे यांना गारद करण्याचा डाव खेळला व तो यशस्वी होत असल्याचे दिसू लागताच स्वत: पक्षाचा उमेदवार जाहीर न करता सत्यजित तांबे यांच्या शिडात हवा भरली.

परिणामी, काँग्रेसच्या अधिकृत घोषीत उमेदवाराला माघार घ्यावी लागली तर ज्याला पक्षाने नाकारले त्या सत्यजित तांबे यांना पुढे करण्याची वेळ डॉ. तांबे यांच्यावर आली. भाजपची खेळी यशस्वी झाल्याने यापुढे पदवीधर मतदारसंघावर काँग्रेस अधिकृत दावा करू शकणार नसला तरी, अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाच्या इच्छुकांना उमेदवारीसाठी झुलवत ठेवून ऐनवेळी निवडणुकीच्या रिंगणात पळ काढण्याच्या भाजपच्या पळपुट्या कृतीचीही आता चर्चा होऊ लागली आहे. निवडणुकीला सामोरे न जाता, समोरच्याला पराभूत करण्यात भाजप यशस्वी झाली खरी. मात्र, कोणतीही निवडणूक जिंकण्यासाठीच लढण्याचा केला जात असलेला दावा फोल ठरला आहे. 

ना जोष, ना जल्लोष!

भारतीय जनता पक्षाला या निवडणुकीतील पराभवाची जणू चाहूल लागली असावी, म्हणूनच नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशीही भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये ना जोष दिसला ना जल्लोष. इच्छूक उमेदवारांना एकीकडे नामांकन दाखल करण्यासाठी प्रोत्साहित केले जात असताना दुसरीकडे त्यांना फक्त कोरे एबी फॉर्म दुरूनच दाखविले जात होते. हातात एबी फॉर्म असूनही भाजपचे पदाधिकाऱ्यांचे सारे लक्ष तांबे पिता- पुत्रावरच लागून होते. त्यातही सत्यजित तांबे यांचे एकांतात भ्रमणध्वनीवरून सुरू असलेले बोलणे भाजपच्या पदाधिकाऱ्यांना सुखावून जात होते.

Web Title: BJP won, BJP lost! The Congress was expelled from the arena, they themselves ran away from the arena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.