नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यापूर्वी महासभा व स्थायी समितीने मंजूर केलेल्या कामांना भिरकावून लावल्याने नगरसेवकांसाठी बेचव झालेले सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक रूचकर करण्यासाठी सत्ताधारी भाजपाने मंजूर कामांचा समावेश करत फोडणी देण्याचा प्रयत्न चालविला आहे. त्यामुळे आयुक्तांनी अगोदरच ३३१ कोटींनी फुगवलेल्या अंदाजपत्रकात आणखी सुमारे २५० ते ३०० कोटींची भर पडण्याची शक्यता असल्याने अंदाजपत्रक दोन हजार कोटी रुपयांच्या पुढे पल्ला गाठणार आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सन २०१८-१९ या वर्षासाठी १७८५.१४ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक गुरुवारी (दि.२२) स्थायी समितीला सादर केले. या अंदाजपत्रकात आयुक्तांनी गतवर्षाच्या तुलनेत ३३१.७५ कोटी रुपयांची भर घातली. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षाचे सुधारित अंदाज पत्रक १४५३.३९ कोटी रुपयांवर ठेपले. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकात आयुक्तांनीच ३३१ कोटी रुपयांची भर घातल्यानंतर स्थायी समितीसह महासभेकडून त्यात फारसा बदल केला जाणार नसल्याची अटकळ बांधली जात होती. परंतु, अंदाजपत्रकात मागील वर्षभरात महा सभेसह स्थायी समितीने मंजूर केलेल्या असंख्य कामांचा समावेश नसल्याने सत्ताधारी भाजपात अस्वस्थता पसरली आहे. नगरसेवकांनीही त्याबाबत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह महापौरांकडे याबाबत नाराजीचा सूर लावला. त्यामुळे, आयुक्तांच्या इशाºयाकडे दुर्लक्ष करत स्थायी समितीसह महासभेकडून गेल्या वर्षभरात मंजूर झालेल्या आणि निविदाप्रक्रियेत असलेल्या तसेच काही कार्यादेशाच्या प्रतीक्षेत असलेल्या कामांचा समावेश अंदाजपत्रकात केला जाणार आहे. स्थायी समिती सभापती हिमगौरी अहेर-आडके यांच्यासह महापौर रंजना भानसी यांच्याकडून अंदाजपत्रकात प्रामुख्याने महिलांसाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांचा समावेश केला जाणार असून, काही योजनांसाठीही तरतूद केली जाणार आहे.२५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासकामांतील काही अत्यावश्यक कामांची अंदाजपत्रकात भर घालत नगरसेवकांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्यामुळे, स्थायी समितीसह महासभेकडून अंदाजपत्रकात सुमारे २५० ते ३०० कोटी रुपयांची भर पडून ते २१०० कोटींच्या आसपास पोहोचण्याची शक्यता आहे. अंदाजपत्रकासंदर्भात भाजपाने शनिवारी (दि.२४) नगरसेवकांची बैठक बोलाविली असून, त्यात सूचना घेऊन कामांचा समावेश केला जाणार आहे.
मंजूर कामांना भाजपाची फोडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:00 AM