मालेगाव : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इतर मागासवर्गीयांचे (ओबीसी) राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याच्या निषेधार्थ शहर भाजपच्या पदाधिकाऱ्यांना माजी पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली मुंबई-आग्रा महामार्गावरील चाळीसगाव फाटा येथे चक्का जाम आंदोलन केले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल अर्धातास खोळंबली होती. तहसीलदार चंद्रजीत राजपूत यांना आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन सादर केले, तर ग्रामीण भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी सटाणा-मालेगाव रस्त्यावरील आघार बुद्रुक येथे चक्का जाम आंदोलन केले होते.जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, महापालिकासारख्या संख्यांमधील ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले आहे. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली होती; मात्र ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात व्यवस्थित बाजू मांडली नसल्यामुळे आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजावर ही वेळ आल्याच्या निषेधार्थ भाजप ओबीसी मार्चाचे प्रदेश उपाध्यक्ष दिपक पवार, भाजपाचे गटनेते सुनील गायकवाड, महानगर प्रमुख मदन गायकवाड, नितीन पोफळे यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी चाळीसगाव फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी नगरसेवक सुनील गायकवाड, भाजपाचे प्रभारी शशिकांत वाणी, दिपक पवार यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टिका केली. या आंदोलनात नितीन पोफळे, दिपक देसले, राजेंद्र शेलार, दिपक गायकवाड, श्रीकांत शेवाळे, मुन्ना अहिरे, राकेश गायकवाड, युवा गिते, विवेक वारूळे, प्रशांत पवार, जयप्रकाश पठाडे आदिंसह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.-------------------------जयकुमार रावल यांची शासनावर टिकाया आंदोलना दरम्यान राज्याचे माजी पर्यटनमंत्री, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष व आमदार जयकुमार रावल आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी राज्य शासनावर टिका केली. २०१९ च्या निवडणुकीत गद्दारी करुन महावसुली सरकार सत्तेवर आले. सत्तेवर आल्यानंतर समाजातील शेतकरी, मराठा, दलित, आदिवासी व इतर कुठल्याही समाजाला न्याय दिला नाही. राजकीय आरक्षण टिकू शकले नाही. सध्याचे शासनातील विभाग राजे बनले असून त्यांच्याकडे वसुलीसाठी वाजे आहेत. ओबीसी आरक्षण रद्द करून निवडणूका घेण्याचा डाव रचला जात आहे. या विरोधात यापुढे तीव्र लढा उभारला जाईल, असे रावल यांनी सांगितले.
मालेगावी भाजपचे चक्का जाम आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 3:20 PM