नाशिक : विधानसभेपूर्वी मुख्यमंत्री पदावरून सुंदोपसुंदी सुरू असतानाच भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये मात्र मुख्यमंत्री भाजपचाच असेल, असे स्पष्ट केले असून, त्यामुळे वाद वाढण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेनेचा जागा वाटपाचा काय फॉर्मुला ठरला ते माहिती नाही; परंतु सर्वाधिक आमदार भाजपचेच निवडून येतील तसेच कोणाचा काहीही कल्पना विलास असो, मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे भाजपच्या राष्टÑीय सरचिटणीस आणि महाराष्टÑाच्या प्रभारी सरोज पांडे यांनी सोमवारी (दि.१५) पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरोज पांडे यांनी नाशिकमध्ये येऊन संघटनात्मक कामांचा आढावा घेतला. तत्पूर्वी त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. भाजप हा देशात अत्यंत मजबूत पक्ष झाला आहे. अनेक पक्षातून लोक भाजपात येण्यास तयार आहेत. देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्रयांच्यावर लोकांचा विश्वास आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, सेनेबरोबर भाजपाची युती आहेच. मात्र कोणीही कल्पना विलास केला तरी मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे स्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.कर्नाटकातील सत्तांतर नाट्यावरून बोलताना त्यांनी भाजपाच डर्टी पॉलिटिक्स करीत नाही. असे सांगतानाच ज्यांना आपले आमदार सांभाळता येत नाही त्यांना कॉँग्रेसला आरोप करण्याचा नैतिक अधिकार नाही, असेही सांगितले.विरोधकांना टोमणा मारताना त्यांनी लोकशाहीत विरोधीपक्ष हा मजबूतच असायला हवा, मात्र देशात आणि राज्यात विरोधीपक्ष निष्प्रभ असून जे नवं नेतृत्व शोधत आहेत, त्यांनी ते लवकर शोधावे यासाठी शुभेच्छा आहेत, असेही त्या म्हणाल्या. यावेळी भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे तसेच पक्षाचे चिटणीस लक्ष्मण सावजी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्टÑात भाजपचाच मुख्यमंत्री : सरोज पांडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 1:29 AM