इंदिरानगर : महापालिकेच्या पूर्व प्रभाग समितीवर सत्ताधारी भाजपाचे पूर्ण बहुमत असल्याने भाजपाचाच सभापती होणार हे निश्चित असून, सलग पाच वर्षे भाजपाचाच सभापती राहण्याचे संकेत आहे.पूर्व प्रभागाच्या सभापतिपदी पाच सदस्यांना संधी मिळणार आहे. आतापर्यंत दोन जणांना संधी मिळाली असून, अजून तीन जणांना संधी मिळणार आहे. पूर्व विभागात पाच प्रभाग असून, या प्रभागात १४, १५, १६, २३ व ३० यांचा समावेश आहे. या पाच प्रभागांतील १९ नगरसेवकांमध्ये भाजपाचे १२, राष्ट्रवादी ४, काँग्रेस २, अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे. भाजपाच्या नगरसेवकांमध्ये सतीश कुलकर्णी, सतीश सोनवणे, डॉ. दीपाली कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, अॅड. श्याम बडोदे, सुप्रिया खोडे, रूपाली निकुळे, शाहीन मिर्झा, उपमहापौर प्रथमेश गिते, सुमन भालेराव, अनिल ताजनपुरे, अर्चना थोरात आदींचा समावेश आहे. राष्ट्रवादीकडून सुफियान जीन, समीना मेमन, सुषमा पगारे, शोभा साबळे, तर काँग्रेसचे राहुल दिवे, आशा तडवी, अपक्ष मुशीर सय्यद असे सदस्यांचे पक्षीय बलाबल आहे. भाजपाकडून नवीन चेहऱ्यांपैकी प्रथमेश गिते यांना उपमहापौर व श्याम बडोदे यांना स्थायी समितीवर आणि शाहीन मिर्झा, सुमन भालेराव यांना पूर्व प्रभाग सभापतीवर संधी देण्यात आली. तसेच चार दिवसांपूर्वीच सतीश सोनवणे यांना सभागृहनेतापदी संधी देण्यात आली आहे. त्यामुळे यंदा चंद्रकांत खोडे, अनिल ताजनपुरे, सुप्रिया खोडे, अर्चना थोरात यापैकी एकाची सभापती वर्णी लागण्याची शक्यता आहे.पूर्व विभागात आतापर्यंत कोणत्याही एका पक्षाला बहुमत प्राप्त झालेली नव्हती. दरवेळी आघाडी किंवा युतीची सत्ता असल्याने वेगवेगळ्या पक्षाचा सभापती विराजमान झालेला आहे. त्यातच काही अपक्षांनीही सभापतिपद भूषवले आहे.
पूर्व प्रभाग सभापतिपदावर भाजपाचा दावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:43 AM