नाशिक : जिल्ह्यातील हल्लाबोल आंदोलनाच्या समारोपप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस व भाजपावर टीकेची झोड उठवल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांनी शरद पवार यांच्यावर रविवारी (दि.11) पलटवार केला. अनेक वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शरद पवारांना शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याची टीका फरांदे यांनी केली आहे. नाशिकला राज्याच्या अर्थसंकल्पात सापत्न वागणूक मिळाल्याच्या चर्चेने जोर धरला असतानाच हल्लाबोल आंदोलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्री व भाजपावर झालेल्या बोच:या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे रविवारी (दि. 11) पक्षाच्या वसंतस्मृती कार्यालयात अर्थसंकल्पातील तरतुदींविषयी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती देत पक्षाची भूमिका मांडली. देवयानी फरांदे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस आघाडीच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रासाठी काहीच केले नाही. सिंचन, वीज घोटाळा करून राज्याला भ्रष्टाचाराच्या दरीत लोटले. अशा स्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपा सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असून, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात सर्वसामान्य शेतकरी व कृषी क्षेत्रसाठी भरीव तरतूद केली आहे. तसेच समृद्धी महामार्गामुळे मुंबई ते नागपूरदरम्यानची विविध शहरे मुंबईशी जोडली जाणार असून, स्मार्ट शहरांसोबतच ड्रायपोर्ट, शीतगृहेही उभारण्यात येणार असल्याने राज्याच्या विकासाला चालना मिळणार आहे. परंतु, विकासाच्या विरोधी भूमिका असलेले काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य डावे पक्ष मिळून समृद्धी महामार्गात खोडा घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करीत गेली अनेक वर्षे सत्ता उपभोगणांऱ्या शरद पवारांना शेतकऱ्यांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नसल्याचेही फ रांदे म्हणाल्या. दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी काय तरतूद आहे याविषयी विचारलेल्या प्रश्नांना आमदार देवयानी फरांदे आणि बाळासाहेब सानप यांनी बगल देत नाशिकसाठी सिंहस्थ कुंभमेळ्यासह विविध योजनांमधून सुरू असलेल्या कामांचा उल्लेख करून पत्रकार परिषद गुंडाळली. यावेळी भाजपाचे प्रदेश प्रवक्ता सुहास फरांदे, महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
कौशल्य विद्यापीठाची मागणी करणारराज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या हाती काहीही लागलेले नाही. त्यामुळे नाशिककरांची नाराजी दूर करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात सहा कौशल्य विद्यापीठांपैकी एक विद्यापीठ नाशिकला मिळावे यासाठी मागणी करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.