नाशिक : विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाच्या नगरसेवकांना दोन दिवस ‘वेट अॅण्ड वॉच’चा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊन या निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेनेवरील आपला दबाव कायम ठेवला असून, त्यामुळे सेनेचे नरेंद्र दराडे व जिल्हा विकास आघाडीचे परवेज कोकणी हे दोघेही गॅसवरच आहेत, परंतु भाजपाच्या नगरसेवकांबरोबर कोकणी यांनादेखील मुख्यमंत्र्यांनी मुंबईला पाचारण केलेले असल्यामुळे भाजपा दोन दिवसांनंतर काय भूमिका घेणार हे अप्रत्यक्ष स्पष्ट झालेले आहे.अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्या तरी, भाजपाने यासंदर्भात अधिकृत राजकीय भूमिका न घेतल्यामुळे काहीसे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या जागेवर शिवसेनेने नरेंद्र दराडे यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपाच्या नगरसेवकांनी नेमकी काय भूमिका घ्यावी याबाबत विविध अंदाज बांधले जात असताना, शिवसेनेने पालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवाराला पाठिंबा द्यावा अशी अट भाजपाने टाकली होती, परंतु शिवसेनेने हा प्रस्ताव झिडकारल्यामुळे भाजपाचा विधान परिषद निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भातील संभ्रम दूर करण्यासाठी मंगळवारी तातडीने मुंबईला पाचारण केलेल्या नगरसेवकांची रात्री दीड वाजता मुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची भेट झाली. यावेळी फडणवीस यांनी, विधान परिषद निवडणुकीचा निकाल पक्षासाठी खूपच महत्त्वाचा असल्यामुळे यासंदर्भात विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागणार आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक नुकतीच घेण्यात आली असून, आणखी एक बैठक होणार असल्यामुळे दोन दिवसांत निर्णय कळविला जाईल. तोपर्यंत कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता एकजूट राखा, असे आवाहन केले. त्यामुळे मोठ्या आशेने मुंबईत गेलेल्या नगरसेवकांना त्याचबरोबर जिल्हा विकास आघाडीचे उमेदवार परवेज कोकणी यांना निराशेने परतावे लागले आहे. परंतु कोकणी यांना या बैठकीसाठी पाचारण करून भाजपाने अप्रत्यक्ष मतदारांना नेमके काय करायचे हे जाहीर न करता तसे संकेत दिल्याचेही बोलले जात आहे. या बैठकीस पालकमंत्री गिरीश महाजन, शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, माणिकराव कोकाटे, केदा अहेर, महापौर रंजना भानसी आदी उपस्थित होते. भाजपाने या निवडणुकीबाबत अद्याप कोणतीही भूमिका न घेतल्याने शिवसेनादेखील गॅसवर असून, शिवसेनेने आपल्या मतदारांना एकत्र ठेवण्यासाठी अज्ञातस्थळी रवाना केले आहे. साधारणत: रविवारी मध्यरात्री या मतदारांना नाशिकमध्ये आणण्यात येणार आहे. असे असले तरी तिन्ही उमेदवारांनी घोडेबाजाराला प्राधान्य दिल्यामुळे मतांची फाटाफूट होणारच नाही याची छातीठोक ग्वाही देण्यास कोणीही तयार नाही. कॉँग्रेस आघाडी व मित्रपक्षांच्या नगरसेवकांची बुधवारी सकाळी बैठक घेण्यात येऊन त्यांनाही सहलीसाठी नेण्याबाबत विचारविमर्श करण्यात आला आहे.