मनमाड : नांदगाव तालुक्यात राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ठरल्या गेलेल्या भालूर गटात व गटातील दोन गणात भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भालूर गटात यावेळी प्रथमच भाजपाने एण्ट्री करून आपला झेंडा फडकावला आहे.भालूर गटातील उमेदवाराच्या न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे या वेळीही गट चर्चेत आला होता. त्यामुळे या गटातील माघार लांबली होती. या गटातील भाजपाच्या उमेदवार आशाबाई फकिरा जगताप यांनी नामनिर्देशन अर्जासोबत जोडलेल्या हमीपत्रावर स्वाक्षरी नसल्याने छाननी च्या दिवशी जगताप यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. न्यायप्रविष्ट असलेल्या या प्रकरणाच्या निकालानंतर जगताप या पुन्हा निवडणूक रिंगणात दाखल झाल्या होत्या व आज निकालानंतर विजयी झाल्या आहे.या गटातून प्रतिभा दशरथ हिरे (शिवसेना), आशाबाई फकिरा जगताप (भाजपा), श्वेता प्रशांत ठाकरे (राष्ट्रवादी) या तीन उमेदवारांमध्ये लढत झाली होती. यावेळी भाजपाने प्रथमच एण्ट्री केली होती. भालूर गटाचे प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार संजय पवार व माजी जि. प. सदस्य राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली भाजपा उमेदवारांनी निवडणूक लढविली होती. सुहास कांदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. या लढतीमध्ये भालूर गटातून भाजपाच्या आशा जगताप २,३९० मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या. भालूर गणातून भाजपाचे श्रावण गोरे १,१७५ तर पानेवाडी गणातून साहेबराव नाईकवाडे ८६४ मतांची आघाडी घेऊन विजयी झाले आहे.(वार्ताहर)
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भाजपाची एण्ट्री
By admin | Published: February 24, 2017 12:19 AM