नाशिक : कोणत्याही स्थितीत महापालिकेवर सत्ता पुन्हा मिळवायची असून त्यासाठी संघटना मजबूत करणे आणि प्रत्येक बुथवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. प्रत्येक बुथवर ३० जणांची जबाबदारी निश्चित करायची आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रनिहाय ५ बुथमागे एका शक्ती केंद्र प्रमुखाची नियुक्ती करण्यात येणार आहे. प्रत्येक शक्ती केंद्र प्रमुख हा मंडल अध्यक्षांइतकाच महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश संघटन सरचिटणीस श्रीकांत भारतीय यांनी केले.
भारतीय जनता पार्टीच्या वतीने येथील हॉटेल राॅयल पॅलेसच्या सभागृहात ‘समर्थ बूथ अभियान’ उपक्रमांतर्गत उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना भारतीय यांनी संघटनेचा पाया अधिकाधिक विस्तारण्यावर प्रत्येकाने भर देणे आवश्यक असल्याचे सांगितले. यापुढील प्रत्येक निवडणूक ही आपल्याला स्वबळावर लढवायची असल्याने प्रत्येक जागेसाठी आणि प्रत्येक बुथसाठी आपले कार्यकर्ते सज्ज असणे आवश्यक आहे. पक्ष आहे, संघटन आहे म्हणून आपल्याला महत्त्व आहे. आपल्यामागे संघटना नसेल तर आपल्याला काहीच किंमत उरत नाही, हे प्रत्येकाने लक्षात घेणे आवश्यक असल्याचेही भारतीय यांनी नमूद केले. यावेळी प्रदेश समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर, यावेळी उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, सुमंत घैसास, अरविंद पाटील, सतीश निकम, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदींसह प्रदेश संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
आता संघटन कार्य जोमाने करा
कोरोनाच्या प्रभाव काळात पक्षसंघटनेने जनतेच्या मदतकार्याला प्राधान्य दिले होते. मात्र, आता कोरोनाचा प्रभाव कमी होऊ लागला असून प्रत्येक कार्यकर्त्याने संघटन कार्याला प्राधान्य देण्याचे आवाहन समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर यांनी केले. प्रत्येक बुथमधील ३० जणांच्या समितीत युवा, महिला तसेच समाजातील सर्व जाती, धर्मांमधील घटकांचा त्यात समावेश करून सर्व बुथ समित्या अत्यंत सक्षम करण्याचे आवाहनदेखील आंबटकर यांनी केले.
फोटो (२९ पीएचजे ८९)
भाजपाच्या समर्थ बुथ अभियानअंतर्गत आयोजित मेळाव्यात बोलताना प्रदेश समर्थ बुथ संयोजक रामदास आंबटकर. समवेत व्यासपीठावर श्रीकांत भारतीय, रवी अनासपुरे, सुमंत घैसास, अरविंद पाटील, सतीश निकम, प्रदेश प्रवक्ता लक्ष्मण सावजी, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, शहराध्यक्ष गिरीश पालवे, विजय साने आदी.