लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : राज्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आलेले अपयश, लॉकडाउनमुळे शेतकरी, शेतमजुरांचे होत असलेले हाल लक्षात घेता त्यांच्यासाठी ५० हजार कोटींचे पॅकेज जाहीर करावे आदी मागण्यांसाठी प्रदेश भारतीय जनता पक्षाने पुकारलेल्या ‘महाराष्टÑ बचाव’ आंदोलनात शुक्रवारी नाशिक शहर, जिल्ह्यातील भाजप नेते, कार्यकर्त्यांनी सहभागी होत सरकारचा निषेध नोंदविला.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास महाराष्टÑ सरकार अपयशी ठरले असून, दरदिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत अधिकाधिक नागरिकांची टेस्ट केली जावी, अशी वारंवार मागणी करूनही सरकार त्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांना मृत्यूच्या खाईत लोटत असल्याची तक्रार करून भारतीय जनता पक्षाने महाराष्टÑ बचाओ आंदोलनाची हाक दिली आहे. महाराष्टÑ सरकारने शेतकरी, शेतमजूर, गोरगरिबांना वाऱ्यावर सोडले असून, वाहतुकीची व्यवस्था नसल्याने मजुरांना पायीच मार्गक्रमण करावे लागत आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमाल विक्रीची कोणतीही व्यवस्था केलेली नाही, परिणामी शेतकरीही संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतक-यांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणीही यावेळी भाजपने केली. शुक्र्रवारी भाजपाचे खासदार, आमदार, पदाधिकारी, नगरसेवकांनी आपापल्या कार्यालयासमोर, घराच्या अंगणात एकत्र जमून राज्य सरकारच्या विरोधात घोेषणाबाजी करून फलक फडकाविले. यावेळी सर्वांनीच काळे कपडे परिधान करून सुरक्षित अंतर राखले. खासदार भारती पवार, जिल्हाध्यक्ष केदा आहेर, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह प्रमुख पदाधिकाºयांनी आपापल्यापरीने आंदोलन यशस्वी केले.