नाशिक : महापालिका निवडणुकीच्या आधी तिकीटविक्री प्रकरणाने गाजलेल्या भाजपासाठी आता आणखी एक डोकेदुखी पुढे आली आहे. भाजपाच्या आमदार सीमा हिरे यांनीच पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका, असे सांगितल्याची एक कथित ध्वनिफीत प्रसारित झाली आहे. त्यामुळे पक्षाला धक्का बसला आहे. याबाबत योग्य ती तपासणी करण्यात येईल, असे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जाहीर केले आहे.भाजपाच्या पश्चिम नाशिक विधानसभा क्षेत्राच्या आमदार असलेल्या सीमा हिरे यांच्या कन्येला नाशिक महापालिकेसाठी उमेदवारी नाकारण्यात आली होती. मात्र प्रभाग सातमध्ये त्यांचे दीर योगेश हिरे यांना उमेदवारी मिळाली. त्यामुळे केवळ त्यांनाच मते द्या अन्य उमेदवाराला मते देऊ नका, तसेच प्रभाग ८ मध्ये भाजपाचे उमेदवार अमोल पाटील यांना मते देऊ नका, असे एका कार्यकर्त्याला सांगितले जात असल्याची ध्वनिफीत अचानक सोशल मीडियावर प्रसारित झाली. त्यामुळे भाजपांतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. विशेष म्हणजे गेल्या २३ तारखेला मतमोजणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपा कार्यालयात नवनिर्वाचित नगरसेवकांच्या सत्काराच्या वेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्याचे सांगत त्यासंदर्भात पुरावे प्राप्त झाल्याचे म्हटले होते. दरम्यान, सीमा हिरे यांनी मात्र या प्रकाराचा इन्कार केला आहे. तर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सर्व प्रकारची पडताळणी करू, असे अगोदरच सांगितल्याचे माध्यमांना स्पष्ट केले आहे. महापालिका निवडणुकीच्या वेळी प्रत्येक उमेदवाराकडून दोन दोन लाख रुपये जमा केले जात असल्याची चित्रफीत प्रारंभी प्रसारीत झाली होती. भाजपाने त्याचे समर्थन केले होते व प्रचारासाठी हा निधी वापरला जाणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर भाजपाच्या कामगार आघाडीचे नेते गोपाळ पाटील यांनी पक्षाला दहा लाख रुपये दिल्याची चित्रफीत प्रसारित झाली होती. त्यावेळी भाजपाने हात झटकले आणि विरोधकांवर खापर फोडले होते. आता मात्र पक्षाच्या आमदारावरच शंका घेणारी ध्वनिफीत पुढे आल्याने भाजपात गोंधळ सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
भाजपातील ‘पाडापाडी’ आता चव्हाट्यावर !
By admin | Published: March 03, 2017 2:06 AM