नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्थायी समितीत भाजपाचा एक सदस्य कमी करून शिवसेनेचा एक सदस्य वाढविताना भाजपाने धक्कातंत्राचा वापर करून संपूर्ण समितीचीच पुनर्रचना करून नव्याने सर्वच सदस्यांच्या नियुक्तीची घोेषणा केली आहे. विशेष म्हणजे फाटाफूट टाळण्यासाठी भाजपाने आजी-माजी सभापती आणि माजी महापौरांचा देखील समितीत समावेश केला आहे.
स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या रिक्त होणाऱ्या आठ जागांसाठी बुधवारी (दि. २४) महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष महासभा बोलविली हेाती. या ऑनलाईन सभेत संपूर्ण समितीची पुनर्रचना केली आहे. खरे तर भाजपाचा एक सदस्य कमी करून त्या जागी शिवसेनेची जागा वाढवायचे आदेश होते. त्याचे कारण म्हणजे महापौर सतीश कुलकर्णी यांनी गेल्यावर्षी सदस्य नियुक्ती करताना पक्षीय तौलनिक बलाचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवण्यात आल्याने महापौरांनी पक्षाचा एक सदस्य कमी करण्याची नामुष्की टाळण्यासाठी संपूर्ण समितीची पुनर्रचना केली आहे.
नव्या समितीत मावळते सभापती गणेश गिते, माजी महापौर रंजना भानसी, माजी स्थायी समिती सभापती हिमगौरी आडके, योगेश तथा मुन्ना हिरे, प्रतिभा पवार, इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर आणि मुकेश शहाणे यांना भाजपने संधी दिली आहे तर शिवसेनेकडून मागील वेळी महापौरांनी ज्यांच्या नावाची घाेषणा टाळली, त्या ज्योती खोले यांच्याबरोबरच केशव पोरजे, रत्नमाला राणे यांना संधी दिली आहे. समितीत पक्षाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर आणि सत्यभामा गाडेकर यांची अगेादरच नियुक्ती झाली आहे. तर मनसेच्यावतीने सलीम शेख यांना संधी देण्यात आली आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य निवृत्त होत नसल्याने जुन्याच सदस्यांची फेरनियुक्ती करताना राहुल दिवे आणि समीना मेमन यांनाही पुन्हा कायम ठेवण्यात आले आहे.
इन्फो...
किंगमेकर मनसेकडे आणि मनसे भाजपाकडे
स्थायी समितीत आता भाजपाचे आठ सदस्य असून विरोधकांपैकी शिवसेनेचे पाच तसेच काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेचे एकेक सदस्य म्हणजे आठ सदस्य आहेत. परंतु महापौर निवडणुकीत मनसेने भाजपाला साथ दिल्याने आताही मनसेचे सलीम शेख हे भाजपबरोबरच जातील असे मानले जात आहे त्यामुळे मनसे किंगमेकर मानली जात आहे.
इन्फो..
स्थायी समितीतील पक्षनिहाय सदस्य
भाजपा- गणेश गिते, रंजना भानसी, हिमगौरी आडके, योगेश तथा मुन्ना हिरे, प्रतिभा पवार, इंदुबाई नागरे, माधुरी बोलकर आणि मुकेश शहाणे
शिवसेना - सुधाकर बडगुजर, सत्यभामा गाडकेर, ज्योती खोले, केशव पेारजे, रत्नमाला राणे
मनसे - सलीम शेख,
राष्ट्रवादी - समीना मेमन
काँग्रेस - राहूल दिवे