नितीन बोरसे सटाणाबागलाणचे राजकीय केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जायखेडा गटात समाविष्ट असलेल्या जायखेडा गणात महिलाराज येणार आहे. कारण हा गण ओबीसी प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षित करण्यात आला आहे. माजी आमदारांसह विविध पक्षप्रमुख व दिग्गजांच्या भूमीत यंदाच्या निवडणुकीत अनेक इच्छुकांना महिला आरक्षणामुळे आपल्या सौभाग्यवतींसाठी मतांचा जोगवा मागावा लागणार आहे. दिग्गजांच्या या आखाड्यात भाजपाला आपला गण राखण्यासाठी कसरत करावी लागणार आहे, तर राष्ट्रवादी कॉँग्रेसला गेल्या निवडणुकीत गेलेला गण मिळविण्यासाठी सक्षम रणरागिणीचा शोध घ्यावा लागत आहे. भाजपा व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यात होणाऱ्या लढतीत दिग्गज नेत्यांची मात्र प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.जिल्हा परिषद वा पंचायत समिती निवडणूक म्हटले की, पक्षापेक्षा व्यक्तीलाच पसंती दिली जाते. त्यामुळे पक्षीय पातळीवरदेखील इलेक्टिव्ह मेरिट असलेल्या प्रभावी व्यक्तीला तिकिटासाठी पसंती देत असतात. त्यामुळे पक्षनिष्ठा याला फार अशी किंमत दिली जात नाही. या गणातदेखील अशाच पद्धतीने प्रत्येक पक्ष विचार करताना दिसून येत आहे. जायखेडा गण म्हटला की, बागायती क्षेत्र व श्रीमंत शेतकरी समोर येतो. शेतीबरोबरच राजकीयदृष्ट्यादेखील या परिसराचा दबदबा राहिला आहे. हा गण गेल्या निवडणुकीत अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी आरक्षित होता.मोसम खोरे हे एकेकाळी उसाचे आगार म्हणून ओळखले जात. त्यात जायखेडा गाव परिसर गुऱ्हाळासाठी प्रसिद्ध होते. हा गण मराठा व भिल्लबहुल असल्याने माजी आमदार दिलीप व उमाजी या बोरसे बंधूंबरोबरच मराठा समाजाचे उदाराम देवरे, कै. जयवंतराव सावंत, कै.बी.के. कापडणीस, भटू सावळा, नारायण कोर, देवा पवार, प्रा. जी.के. कापडणीस, विजय सावळा, कृष्णा भामरे यांचा दबदबा राहिला आहे. त्यांना अल्पसंख्याक समाजाचे सोमनाथ ब्राह्मणकर, भिला आत्माराम ब्राह्मणकर, दलित नेते पंडितराव मोरे यांची साथ लाभल्यामुळे सर्वाधिक काळ मराठा व भिल्ल समाजाने प्रतिनिधित्व केले. त्याची परतफेड म्हणून सन १९९१मध्ये बागलाण विकास आघाडीचे उमेदवार सोमनाथ ब्राह्मणकर यांना भरघोस मतांनी निवडून दिले.
गण राखण्यासाठी भाजपाची कसरत
By admin | Published: February 04, 2017 1:00 AM