पंचवटी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेच्या आडगाव येथील घरकुल योजनेला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला असून, या योजनेविरोधात बुधवारी आडगाव ग्रामस्थांनी कडकडीत बंद पाळला. दरम्यान, त्यानंतर झालेल्या ग्रामसभेत आडगाव ग्रामस्थांनी येत्या शुक्रवारी होणाऱ्या म्हाडा घरकुल योजनेच्या भूमिपूजन सोहळ्याला कडाडून विरोध दर्शविला असून, काळे झेंडे दाखवून विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामसभा आटोपल्यानंतर ग्रामस्थांनी नाशिक प्रांत, तहसीलदार तसेच म्हाडाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या बैठकीत विरोध दर्शवून ग्रामस्थांच्या वतीने निवेदन दिले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी यावर अंतिम निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात आले. आडगाव शिवारातील जुन्या मानोरी रस्त्यावर तीन एकर जागा असून, सदर जागेवर नियोजित घरकुल योजनेचा प्रकल्प उभा करण्याची तयारी शासनाने सुरू केली आहे. सदर जागा ही शैक्षणिक संकुलासाठी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांची असून, या जागेसाठी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ लढा देत आहेत.
आवास योजनेच्या भूमिपूजनाला दाखविणार काळे झेंडे
By admin | Published: April 13, 2017 12:18 AM