दिनकर आहेर, खामखेडा : ९ मार्च २०१४ ची रात्रीची नऊ वाजेची वेळ होती. दक्षिणेकडून राक्षसी पावलाने घोंगावत आलेल्या गाभ्रीच्या पावसाने अक्षरश: कहर केला आणि अवघ्या नऊ ते दहा मिनिटांत खामखेडासह पंचक्रोशीतील शेतातील उभी पिके भुईसपाट झाली होती. शेतजमिनीवर पाव ते अर्धा फूट साचलेल्या बर्फाच्या थराने शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुराडा केला होता. शनिवारी (दि.९) या घटनेला बरोबर पाच वर्षे लोटली आहेत. मात्र, ९ मार्च उजाडला की आजही या घटनेच्या आठवणींनी शेतकऱ्यांचा थरकाप उडतो.पाच वर्षापूर्वी ९ मार्च २०१४ रोजी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास खामखेडा या गावावर निसर्ग कोपला. वादळी वा-यासह झालेल्या गारांच्या पावसाने कळवण व देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना अक्षरश भुइसपाट केले. बुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावसाने केले होते. पोटच्या मुलाप्रमाणे खर्च करून जपलेला कांदा हातात येण्याऐवजी भुइसपाट झाल्याने शेतक-यांच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर दाटला होता. दीड ते दोन तास वादळी पाउस व अर्धा किलोच्या वजनाच्या गारेने आंब्याबरोबरच रब्बी पिकांचे अतोनात नुकसान केले होते. ही गारपीट इतकी भयानक होती, की दोन दिवस शेतातील गारांचा थर वितळला नव्हता. आजही या घटनेच्या नुसत्या विचाराने शेतक-यांचा थरकाप उडतो.यंदा दुष्काळी स्थितीपाच वर्षांपूर्वी झालेला हा गाभ्रीचा पाऊस आजही शेतक-यांसह गावक-यांना आठवतो. गावाने पहिल्यांदाच अशी भयानक नैसर्गिक आपत्ती अनुभवली होती. त्यामुळे मार्च महिना आला की गावातील शेतक-यांना त्या काळरात्रीच्या आठवणींनी थरकाप उडतो. या घटनेमुळे जे नुकसान झाले, त्यातून आजही अनेक शेतकरी कुटुंबे सावरलेली नाहीत. यंदाही परिसरात दुष्काळ सदृश परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग चिंतेत आहे.
गाभ्रीच्या पावसाची ती ‘काळरात्र’ आजही खामखेडावासियांच्या स्मरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 4:08 PM
फ्लॅशबॅक : पाच वर्षांपूर्वी गारपीटीने उडविली होती दाणादाण. आठवणींनी उडतो थरकाप
ठळक मुद्देबुजुर्गांनी त्यांच्या हयातीत असा गारांचा पाऊस पाहिला नव्हता. खामखेडा, भऊर, विठेवाडी, सावकी, बेज, भादवण, पिळकोस, बगडू, लोहणेर आदी गावांमधील कांदा, डाळिंब , गहू , हरभरा, कोबी, मिरची , कांद्याचे डोंगळे, टोमाटो आदि पिकांचे शंभर टक्के नुकसान या गाभ्रीच्या पावस