सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ९ व १० मध्ये रस्ता रुंदीकरणाची कामे झपाट्याने सुरू आहेत. ही कामे दर्जाहिन, निकृष्ट असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिक गणेश मेहेत्रे व कमलाकर ह्याळीज यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेऊन अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी काम सुरू असलेल्या ठिकाणची प्रत्यक्ष पाहणी केली होती. प्राथमिक पाहणीत नागरिकांच्या तक्रारीत काहीअंशी तथ्य असल्याने संबंधित ठेकेदारास मुख्यालयात बोलावून घेतले होते. अतिरिक्त आयुक्तांसमोर निकृष्ट कामाचे पितळ उघड होऊनही ठेकेदाराकडून त्याच पद्धतीने काम सुरू असल्याचा आरोप करत तक्रार नागरिक ह्याळीज व म्हेत्रे यांनी पुन्हा केला आहे, तर या वादात सातपूर शिवसेनेने उडी घेतली आहे. संबंधित ठेकेदाराकडून सुधारणा न होता निकृष्ट दर्जाचे काम केले जात असून, त्यास काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी शिवसेनेचे उपमहानगरप्रमुख देवा जाधव, युवराज धात्रक, किशोर निकम, समाधान देवरे, गोकुळ नागरे, शांताराम कुटे आदींनी केली आहे. कामात सुधारणा न झाल्यास शिवसेना स्टाइलने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; शिवसेनेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:12 AM