लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : मुंढेगाव जवळील जिंदाल कंपनीत सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या स्फोटात जखमी झालेल्या ९ रुग्णांना नाशिक मधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. यातील पाच रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून चार रुग्णांचा धोका टळला असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. दरम्यान स्फोटातील जखमी पैकी एकही रुग्ण जिल्हा रुग्णालयात अद्याप उपचारासाठी दाखल झालेला नसल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी सांगितले.
कंपनीत भीषण स्फोट झाला असून आग विझवण्यासाठी नाशिक येथील अग्निशमन दलाचे 7 मेगा बाऊजर बंब जिंदाल कारखान्यात दाखल. तसेच हायड्रोलीक शिडी असलेला बंब ही घटनास्थळी रवाना झाले आहेत. तसेच अंबड व सिन्नर एमआयडी सीतून अग्निशमन दलाचे बंब जिंदाल कंपनीकडे रवाना झाले आहेत. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातील वैदयकीय पथकही सतर्क झाले असून जिंदाल स्फोटातील जखमींना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले जात आहे.
जिल्हा रुग्णालयातील २५ डॉक्टर , परिचारिकांच्या पथकाने उपचाराची तयारी केली असून जखमींवर उपचारासाठी वैद्यकीय पथक सज्ज आहे. जिंदल कंपनीतील स्फोटाची भीषणता लक्षात घेऊन डॉक्टर्स परिचारिका वॉर्ड बॉय आदी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना जिल्हा रुग्णालयात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांनी दिली आहे.
आगीचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महामार्गावरूनदेखील या आगीच्या धुराचे लोट दिसत आहेत. या कंपनीत एक हजारांहून अधिक कामगार आहेत.