नाशिक : अंध व्यक्तींनी जिद्दीने उभे राहिले पाहिजे. अंधत्व ही समस्या असली तरी तिच्यावर मात करून पुढे गेले पाहिजे, असे प्रतिपादन महिंद्रा अँड महिंद्राचे हिरामण अहेर यांनी केले. सोमवारी (दि.१५) दुपारी पंडित कॉलनी येथील लायन्स हॉल येथे आयोजित ‘पांढरी काठी दिन’ कार्यक्रमात ते बोलत होते. दि ब्लाइन्ड वेल्फेअर आॅर्गनायझेशन व लायन्स क्लब आॅफ नाशिक कार्पोरेट यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अहेर पुढे म्हणाले, सध्या अंधांसाठीही मोठ्या प्रमाणात आधुनिक साहित्य, तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. त्याच्या सहाय्याने ते सुलभतेने शिक्षण घेऊ शकतात. दिव्यांग व्यक्तीही आपल्यातील दिव्यांगावर मात करत यशाची शिखरे पादाक्रांत करतात. त्यांचा आदर्श घेत अंध बांधवांनी प्रगती साधावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अंध बांधवांना पांढऱ्या काठ्या, धान्य, शैक्षणिक मदत आदींचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. कार्यक्रमास राजेंद्र वानखेडे, राजू व्यास, डी. एस. पिंगळे, सोमेश्वर काबरा, शेखर सोनवणे, सचिन शहा, अविनाश पाटील, विलास पाटील, विजय विधाते, अशोक वैश्य आदी उपस्थित होते. अरुण भारस्कर यांनी सूत्रसंचालन केले. कल्पना पांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. विजया मराठे यांनी आभार मानले. याप्रसंगी सपना चांडक, शांताराम नेटवणे, दत्ता पाटील, प्रशांत कर्पे आदींसह अंध बांधव व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
अंध बांधवांना धान्य; तर पाल्यांना आर्थिक मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2018 12:16 AM