नाशिक- महापालिकेच्या वतीने दिव्यागांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या असल्या तरी गेल्या तीन वर्षात राखीव असलेला निधीच खर्च झालेला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करावा यासाठी अंध अपंगांनी महापालिकेच्या राजीव गांधी भवनावर धडक दिली.
महापालिकेच्या अंदाजपत्रकात दर वर्षी अंध अंपगांसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवण्याची तरतूद आहे. मात्र हा निधी खर्च केला जात नाही. गेल्या २०१६-१७ पासून हा निधी खर्च झालेला नाही. याबाबत दिव्यांगाच्या संघटनांच्या वतीने देखील महापालिकेला पत्र व्यवहार करून उपयोग झालेला नाही असे दिव्यांग हक्क संघर्ष समितीच म्हणणे असून हा निधी खर्च करावा यासाठी महापालिकेच्या प्रवेशव्दारावर धडक दिली. त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन आंदोलन टाळले आणि संघटनेचे निवेदन स्विकारले.
महापालिकेने दिव्यांगासाठी विविध योजना घोषित केल्या खºया परंतु त्याती अनेक नियम आणि अटी जाचक आहेत. त्यामुळे त्याचा लाभ दिव्यांगांना घेता येत नाही. स्वयंरोजगार योजनेत देखील अटी जाचक असून त्याचा लाभ मिळूच शकत नाही अशी व्यवस्था आहे. त्यामुळे अटी शर्ती शिथील कराव्या अशी मागणी सचिन पानमंद, सुनील पवार, विजय गायकवाड, उत्तम फरताळे, शोभा शिंदे, प्रतिक सोनवणे, राधा आठवले, निवृत्ती केदारे, रूपेश भालेराव, किरण पाटील यांच्यासह अन्य दिव्यांगांनी केली आहे.