नाशिक : मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी नेमलेल्या केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) देण्यात येणाºया मानधन वाटपात आर्थिक घोटाळ्याची चौकशी करणा-या समितीला अनेक धक्कादायक बाबी आढळल्या असून, शासकीय पातळीवरील भ्रष्टाचाराला पायबंद घालण्याची जबाबदारी असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्यातील काही सेवानिवृत्त पोलीस कर्मचाºयांनाही कागदोपत्री बीएलओ दाखवून त्यांच्या नावावर पैसे लाटल्याचे उघड झाले आहे. या साºया प्रकरणात दोषी असलेल्या एका नायब तहसीलदाराला मात्र पाठीशी घातले जात असल्याचेही कागदपत्रांवरून स्पष्ट झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. गेल्या महिन्यात सर्वप्रथम ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. मालेगाव तालुक्यात निवडणूक कामासाठी पाचशेहून अधिक बीएलओंची नेमणूक करण्यात आलेली असून,त्यांच्या नावे दरवर्षी हजारो रुपयांचे मानधन बॅँक खात्यात जमा केले जात आहे. तथापि, दरवर्षी मानधन घेणाºया बीएलओंकडून मात्र निवडणूक आयोगाचे काम केले जात नसल्याचे लक्षात आल्यावर चौकशी केली असता, बहुतांशी बीएलओ कागदोपत्री दाखवून त्यांच्या नावे बँक खात्यात पैसे जमा करून नंतर या रकमेचा अपहार केल्याचे उघड झाले होते. यासंदर्भात मालेगाव तहसील कार्यालयातील सोनवणेनामक कर्मचा-यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. मात्र या कर्मचा-याला अद्यापही पोलिसांनी अटक केली नसल्याचे व त्यामुळे त्याचे निलंबन रखडल्याचे बोलले जात असले तरी, या साºया घोटाळ्यात निवडणूक नायब तहसीलदाराची महत्त्वाची भूमिका असून, त्याच्या संमतीशिवाय हा घोटाळा होऊच शकत नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र त्याला सोयीस्कर पाठीशी घालण्यात येत असून, त्याबाबत वारंवार वरिष्ठ कार्यालयाला कळवूनही नायब तहसीलदार सहीसलामत सुटल्याचे सांगितले जात आहे. बीएलओंच्या मानधन घोटाळ्यात ज्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्या सोनवणेचे नातेवाईक, पत्नी, मित्र, मैत्रिणींना कागदोपत्री बीएलओ दाखविण्यात आले, त्याचबरोबर काही पोलीस कर्मचाºयांचीही नावे त्यात घुसडविण्यात आल्याचे चौकशीत उघड झाले आहे.
बीएलओ मानधन घोटाळा: सेवानिवृत्त पोलीसही लाभार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:48 AM