नाशिक : निवडणूक कामात समन्वयाची आणि प्रत्यक्ष कामकाजात महत्त्वाची भूमिका बजविणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओ सुपरवायझर यांना प्रतीवर्षी १२ हजार रुपये मानधन देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे बीएलओ पर्यवेक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. याबाबतचे आदेश शासनाने नुकतेच काढले असून, याबाबतचे परिपत्रक निवडणूक शाखेलादेखील प्राप्त झाले आहे.राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघाच्या मतदारयाद्यांची विश्वसनीयता सुनिश्चित होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रत्येक मतदान केंद्रासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बुथ लेव्हल आॅफिसर्स) यांची नेमणूक झालेली आहे. प्रत्येक दहा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या कामकाजावर देखरेख तसेच मूल्यमापन करण्यासाठी एका पर्यवेक्षकाची (बीएलओ सुपरवायझर) यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. मतदारयाद्यांची पडताळणी आणि पारदर्शक यादी होण्यासाठी मतदान नोंदणी अधिकारी (इलेक्ट्रोल रजिस्ट्रेशन आॅफिसर) यांना सहाय्य करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या कामकाजावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी केंद्रस्तरीय पर्यवेक्षक अधिकारी करीत आहेत. त्यांना या कामासाठी मानधन देण्याचे निर्देश भारतीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.महसूल प्रबोधिनीचे विद्यमान उपजिल्हाधिकारी तसेच भारत निवडणूक आयोग दिल्ली यांचे निडणूक विषयक प्रशिक्षक अरुण आनंदकर हे अहमदनगर येथे उपजिल्हाधिकारी असताना त्यांनी बीएलओ मानधना संदर्भात आयोगाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेकदा पत्रव्यवहार करून अन्य राज्यांतील निवडणूक प्रणालीतील चांगल्या बाबी राज्यात लागू करण्यासंदर्भात देखील भूमिका मांडलेली आहे. विशेषत: मानधनाच्या मुद्द्यावर त्यांनी भारत निवडून आयोग आणि शासनाकडे पाठपुरावा चालविला होता.
बीएलओ पर्यवेक्षकांना मिळणार १२ हजार मानधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2019 12:35 AM