नाशिक (सुयोग जोशी) : नाशिक : मुंबई-धुळे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर आडगाव जुना जकात नाका येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तसेच विविध मागण्यांसाठी शनिवारी सकाळी मराठा समाज बांधवाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेे. त्यामुळे दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प झाली होती.
मराठा समाजाला ओबीसीमधून ५९ टक्क्यांच्या आत आरक्षण द्यावे, सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे, तयार करण्यात आलेला सगेसोयरे मसुदा त्याचे कायद्यात रूपांतर करून तत्काळ जीआर काढावा. येत्या २० तारखेला विशेष अधिवेशन होत असून या अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील सर्व आमदार,मंत्री महोदयांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी एकजुटीने आवाज उठवावा या सर्व मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाजाच्या वतीने जागे व्हा जागे व्हा महाराष्ट्रातील आमदारांनी जागे व्हा, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे, एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, या घोषणांनी संपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून सोडला. मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वय करण गायकर यांनी सांगितले की, आम्ही आज शांततेच्या मार्गाने आंदोलन करतोय परंतु २० तारखेनंतर आम्ही शांत बसणार नाही.
आंदोलनात नाना बच्छाव, चंद्रकांत बनकर, बालाजी माळोदे, सुनील जाधव, अतुल मते, प्रभाकर माळोदे, किरण डोखे, उमेश शिंदे, मिथुन लबडे, वैभव दळवी, विकास काळे, प्रकाश रसाळ, संतोष जगताप, सचिन पवार, पोपट शिदे, रामभाऊ जाधव, रवींद्र जाधव आदी समाज बांधव उपस्थित होते.
येत्या २० तारखेला होणाऱ्या अधिवेशनात आमच्या हक्काच्या मागण्या पूर्ण केल्या तर सरकारच अभिनंदन करू नाहीतर सरकारच्या विरोधात आंदोलन उभे करू. -नाना बच्छाव, उपोषणकर्ते
रूग्णवाहिकेला दिली जागा :
रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांकडून परत एकदा शिस्तीचे दर्शन बघायला मिळाले. एवढी वाहतूक ठप्प झालेली असताना रूग्णवाहिकेला जाण्यासाठी बांधवांनी रस्ता करून दिला.