नाशिक : नाशिकरोड येथील घंटागाडी कामगाराच्या मृत्यूप्रकरणी ठेकेदार आणि सुपरवायझरसह अन्य व्यक्तींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२६) घंटागाडी कामगारांनी जिल्हा शासकीय रुग्णालयासमेारच रास्ता रोकाे केले. शवविच्छेदनाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर त्याची रीतसर चौकशी करण्यात येईल असे अश्वासन पेालीसांनी दिल्यानंतर संबंधीतांनी शव ताब्यात घेतले. महापालिकेच्या घंटागाडी कामगार आणि नाशिकरोड येथील ठेकेदार यांच्यात गेल्या वर्षभरापासून विविध कारणांवरून संघर्ष सुरू आहे. त्यातच नाशिकरोड येथील कामगार केशव आत्माराम कांबळे हे आजारी पडले आणि नंतर त्यांचे उपचार सुरू असताना निधन झाले. मानसिक छळामुळे ते आजारी पडले आणि त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला असा त्यांच्या कुटुंबीय आणि श्रमिक सेवा संघाचा आरोप होता.
गुरूवारी (दि.२५) या कामगाराचे निधन झाल्यानंतर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेतली परंतु उपयोग झाला नाही. शुक्रवारी (दि.२६) त्या मृत कामगाराचे शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात आणण्यात आल्यानंतर कामगारांनी आधी गुन्हा दाखल करावा मगच शव ताब्यात घेण्यात येईल अशी भूमिका घेतली. महादेव खुडे यांच्या नेतृत्वाखाली कामगार आक्रमक झाल्यानंतर अन्य विभागातील घंटागाडी कामगार देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर कामगारांनी जिल्हा शासकीय रूग्णालयासमोरच रास्ता राेको केले. यावेळी नाशिकरोड पेालीस ठाण्याचे निरीक्षक सोमवंशी यांनी मध्यस्थी केली आणि शवविच्छेदनाची प्रक्रीया पार पडल्यानंतर याेग्य ती कारवाई करण्यात येईल असे अश्वासन दिल्यानंतर शव ताब्यात घेतल्याचे खुडे यांनी सांगितले. संबंधीत कामगरावर साक्री येथे अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. ठेकेदार आणि सुपरवायझरच्या छळामुळे या कामगाराची प्रकृती बिघडली आणि रूग्णालयात दाखल करण्यात आले त्याचवेळी या कामगाराच्या पत्नीने पेालीसांत तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर २२ फेब्रुवारीस त्या कामगाराने देखील चार जणांची नावे पेालीसांना सांगितली होती. त्यानंतरही पोलीसांनी कारवाई न केल्याने अखेरीस आंदोलन करण्याची वेळ आल्याचे खुडे यांनी सांगितले.