उमराणे : शासनाने अघोषीत कांदा निर्यातबंदी केल्याने मंगळवार ( दि.१५ ) रोजी सकाळी १० वाजता संतप्त कांदा उत्पादक शेतकर्यांनी लिलाव बंद पाडून राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर एकत्र येत तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी शासनाच्या या निणर्याचा निषेध नोंदवत तात्काळ निर्यातबंदी उठविण्यात यावी अशी मागणी करत महसूल विभागाचे मंडल अधिकारी एस.जी.पाटील व देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले. सोमवार ( दि.१४ ) रोजी सकाळच्या सत्रात कांद्याचे दर तिन हजार दोनशे रुपयांपर्यंत निघाले होते. परंतु दुपारी अघोषीत निर्यातबंदी बंदी झाल्याचे कळताच दुपारच्या सत्रात अचानक कांदा दरात सुमारे चारशे ते पाचशे रुपयांची घसरण होत कांद्याचे दर अडीच हजार रुपयांपर्यंत खाली आले होते. परिणामी येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकर्यांसह व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली असुन त्याचे तिव्र पडसाद सकाळी लिलाव सुरु होताना दिसुन आले. कांदा लिलाव सुुरु होताच कमी बाजारभाव निघाल्याने संतप्त शेतकऱ्यांनीलिलाव बंद पाडून राष्ट्रीय महामार्गावर धाव घेत तब्बल अर्धा तास रास्ता रोको आंदोलन आंदोलन छेडले. यावेळी संतप्त शेतकर्यांनी शासनविरोधी घोषणाबाजी करत तात्काळ निर्यातबंदी उठविण्यात यावी अशी मागणी केली. येथील जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे यांनी शेतकर्यांचे प्रतिनिधीत्व करत मनोगत व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रास्ता रोको आंंदोलनाप्रसंगी शासनाचे प्रतिनिधी म्हणून महसूल विभागाचे मंडल अधिकारी एस.जी.पाटील व देवळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना नंदन देवरे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजु शिरसाठ यांच्या वतीने लेखी निवेदन देण्यात आले. रास्ता रोको आंंदोलनाप्रसंगी शेकडो कांदा उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
उमराणेत शेतकऱ्यांचा रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2020 2:30 PM