नाशिक : कोरोनाच्या धसक्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश नागरिकांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे कारणाविना हॉस्पिटलला जाणे नको किंवा स्वेच्छेने रक्तदानदेखील नको असाच पवित्रा बहुतांश नागरिकांनी स्वीकारला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील रक्तपेढ्यांमधील रक्तसंकलनाचे प्रमाण गतवर्षाच्या तुलनेत ४० टक्क्यांनी कमी असून, रक्तपेढ्यांमध्ये केवळ ५५ ते ६० टक्के रक्तसाठा उपलब्ध आहे.
नाशिक जिल्ह्यात नियमितपणे रक्तदान करणाऱ्यांची संख्या ५ हजारांच्या आसपास आहे. त्याशिवाय कुटुंबातील कुणाला रक्ताची गरज असल्यास त्याबदल्यात रक्त देणाऱ्या दात्यांची संख्यादेखील मोठी आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत संसर्ग नको किंवा ती शक्यतादेखील नको यामुळे रक्तदाते घरीच थांबणे पसंत करीत आहेत. त्यामुळे ज्या गरजू रुग्णांना रक्ताची तातडीची आवश्यकता आहे, अशा रुग्णांच्या रक्तपुरवठ्यात वारंवार अडचणी निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात पुढे येऊन रक्तदान करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. दरवर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यापासून हवामान आरोग्यदायक बनण्यास प्रारंभ झाल्यावर नागरिक स्वत:हून रक्तदानास पुढे येण्याचे प्रमाण अधिक असते. मात्र, यंदाच्या वर्षी नोव्हेंबर महिना उलटून गेल्यानंतर हवेत गारठा निर्माण होऊनदेखील रक्तदाते स्वयंप्रेरणेने पुढे आलेले नाहीत. तसेच कॉलेजेस, शिबिरे, कंपन्यांमधील रक्तदान मोहिमादेखील पूर्णपणे थंडावल्या असल्यामुळे रक्तसंकलनात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. पूर्वी नियमित रक्तदात्यांना रक्तदानासाठी आवाहन केल्यास निम्मे रक्तदाते तरी त्यास प्रतिसाद देत होते. मात्र, सध्याच्या कोरोनाकाळात हे प्रमाण थेट एक चतुर्थांशवर पोहोचले आहे. त्यामुळे निदान नियमित रक्तदात्यांनी तरी स्वयंप्रेरणेने पुढाकार घेऊन रक्तदान करण्याची आवश्यकता रक्तपेढीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
कोट
अद्याप ४० टक्के घट
पूर्वीच्या तुलनेत अद्यापही रक्तदात्यांचे प्रमाण खूपच कमी आहे. गतवर्षीच्या तुलनेत सध्या रक्तपेढीत ३५ ते४० टक्के रक्तसाठा कमी आहे. कमीअधिक प्रमाणात सर्वच रक्तपेढ्यांमध्ये हीच परिस्थिती आहे. आता परिस्थिती सामान्य होत असल्याने रक्तदात्यांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
विनय शौचे, सीईओ, जनकल्याण ब्लड बँक