नाशिक : कोणत्याही कार्यातील उणिवा, त्रुटी दाखवण्याचे काम माध्यमे करीतच असतात. मात्र, कोरोनानंतरच्या काळात ब्लड बँकांकडे पुरेसा रक्तसाठा शिल्लक नाही, ही उणीव केवळ दाखवून तेवढ्यावरच न थांबता लोकमतने ‘रक्ताचं नातं’ हा उपक्रम हाती घेऊन आपल्यापरीने रक्त साठ्यात भर घालण्यासाठी दिलेले योगदान निश्चितच प्रशंसनीय असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले. कोरोनाचे संकट कमी होत असताना रक्त साठ्याच्या तुटवड्याची समस्या राज्यात जाणवू लागल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ या अभिनव उपक्रमाचा प्रारंभ स्वत:च्या रक्तदानाने केल्यानंतर ते बोलत होते.
राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून राज्यभरातील रक्त साठ्यात भर घालण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या रक्तदान महायज्ञांतर्गत शुक्रवारी (दि.२) नाशिक शहरात कालिका मंदिरासमोरील कालिका कॉम्प्लेक्स येथे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी, तर नाशिकरोडला दुर्गा गार्डनजवळील स्टारप्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. कालिका कॉम्प्लेक्स येथे स्वत: रक्तदान केल्यानंतर बोलताना मांढरे यांनी आपण रक्तदान करून दुसऱ्या कुणा व्यक्तीला जीवनदान देऊ शकतोय, ही भावनाच खूप समाधान देणारी असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रत्येक तंदुरुस्त नागरिकाने या उपक्रमात सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहनदेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहायक उपाध्यक्ष बी. बी. चांडक यांनी उपक्रमाची संकल्पना विशद करून राज्यभरात १०० ठिकाणी या अभियानाचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. यावेळी लोकमतचे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी, उपक्रमाचे प्रायोजक दीपक चंदे, शुभ चंदे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. त्याशिवाय अन्य तीन स्थानांवर शुक्रवारी रक्तदान शिबिरांचा प्रारंभ करण्यात आला. त्यातून एकूण १६८ पिशव्या रक्तसंकलन झाले.
इन्फो
रक्त रिचार्ज करतोय, असे समजावे
रक्तदान केल्याने अवघ्या काही दिवसांत तेवढे ताजे रक्त भरून निघत असते. त्यामुळे जसे आपण विशिष्ट काळानंतर मोबाइल रिचार्ज करतो, तसेच काही महिन्यांच्या कालावधीने आपण रक्त रिचार्ज करतोय असे समजून रक्तदान करायला हवे. त्यातून आपला सर्वांत मोठा फायदा म्हणजे रक्तदात्याच्या रक्ताचेही शुद्धीकरण होत असते. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने हा फायदा लक्षात घेऊन रक्तदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मांढरे यांनी केले. मी स्वत: आता पंधराव्या वेळेस रक्तदान करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
इन्फो
शनिवारी दोन केंद्रांवर रक्तदान
शनिवारी (दि.३) सह्याद्री हॉस्पिटल आणि एकलहरेनजीक चांदगिरी ग्रामपंचायत या दोन ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरास शहरासह ग्रामीण भागातूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने महानगराच्या परिघातील गावांचाही या रक्तदान मोहिमेत सहभाग घेण्यात आला आहे.
इन्फो
अन्य तीन केंद्रांवरही रक्तदान
जिल्ह्यात गंगापूररोड परिसरातील निर्मला कॉन्व्हेंटजवळील अरिहंत नर्सिंग होम येथे डॉ. किरण जैन यांच्या उपस्थितीत रक्तदानाला प्रारंभ झाला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सतर्फे गंगापूर रोडवरील जनकल्याण ब्लड बँकेत रक्तदान करण्यात आले. तसेच गंगापूर गावातील क्रांती चौकातील भाजी मार्केटमध्ये शिवसेना गटनेता विलास शिंदे यांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा प्रारंभ झाला. नाशिकला कालिका कॉम्प्लेक्स आणि नाशिकरोडला स्टारप्लस कमर्शिअल मॉल येथे १० जुलैपर्यंत दररोज सकाळी १० ते २ या वेळेत रक्तदान करता येणार आहे. सर्व रक्तदान शिबिरांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.