नाशिक : कोरोनाचे संकट कमी होत असताना रक्तसाठ्याच्या तुटवड्याची समस्या राज्यात जाणवू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, या रक्तदान महायज्ञाचा आजपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करून राज्यभरातील रक्तसाठ्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रक्तदान महायज्ञांतर्गत शुक्रवारी (दि.२) नाशिक शहरात कालिका मंदिरासमोरील कालिका कॉम्प्लेक्स येथे, तसेच नाशिक रोडला दुर्गा गार्डनजवळील स्टारप्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. कालिका कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ९ वाजता तर नाशिकरोडला प्रारंभ पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. त्याशिवाय अन्य तीन म्हणजेच एकूण ५ स्थानांवर शुक्रवारी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदानाने एक जीव वाचविल्याचे समाधान रक्तदात्याला लाभते. त्यामुळे रक्तदानाच्या या महायज्ञात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे, तसेच ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.
इन्फो
या पाच ठिकाणी होणार शिबिरे
नाशिकच्या कालिका मंदिरासमोरील श्री कालिका कॉम्प्लेक्स तसेच नाशिकराेडच्या दुर्गा उद्यानाजवळील स्टार प्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्ससह गंगापूर रोडवर निर्मला कॉनव्हेंटजवळील अरिहंत नर्सिंग होम, इन्स्टीट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्सतर्फे गंगापूर रोडवरील जनकल्याण ब्लड बँकेत तसेच गंगापूर गावातील क्रांती चौकातील भाजी मार्केटमध्ये ही रक्तदान शिबिरे होणार आहेत. पाचही स्थानी रक्तदान शिबिरांना सकाळी ९ पासूनच प्रारंभ होणार असून नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळण्याचीही अपेक्षा आहे.
इन्फो
दोन ठिकाणी दहा जुलैपर्यंत रक्तदान
रक्तदात्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून श्री कालिका कॉम्प्लेक्स तसेच नाशिकराेडच्या दुर्गा उद्यानाजवळील स्टार प्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे १० जुलैपर्यंत रक्तदान करता येणार आहे. शहरातील विविध भागात रक्तदान होणार असले तरी या दोन ठिकाणी मात्र नागरिक १० जुलैपर्यंत कधीही आपल्या सवडीनुसार रक्तदान करू शकतील. त्यामुळे नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लोगो
रक्तदानसंबंधित लोगो आवश्यक.