नाशिक : कोरोनाचे संकट कमी होत असताना रक्तसाठ्याच्या तुटवड्याची समस्या राज्यात जाणवू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’तर्फे ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी आणि ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘लोकमत रक्ताचं नातं’ हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला असून, या रक्तदान महायज्ञाचा आजपासून प्रारंभ करण्यात येणार आहे.
राज्यात कोरोनामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने विविध संस्था, संघटनांच्या माध्यमातून ‘लोकमत’च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिरांचे आयोजन करून राज्यभरातील रक्तसाठ्यात भर घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या रक्तदान महायज्ञांतर्गत शुक्रवारी (दि.२) नाशिक शहरात कालिका मंदिरासमोरील कालिका कॉम्प्लेक्स येथे, तसेच नाशिक रोडला दुर्गा गार्डनजवळील स्टारप्लस मॉल कमर्शिअल कॉम्प्लेक्स येथे सकाळी १० वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत होणार आहे. कालिका कॉम्प्लेक्स येथे होणाऱ्या रक्तदान शिबिराचा शुभारंभ जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे. जगात तंत्रज्ञानाने अनेक अकल्पित गोष्टी वास्तवात आल्या असल्या तरी रक्ताला पर्याय किंवा रक्त बनवणे आधुनिक विज्ञानालाही शक्य झालेले नाही. त्यामुळेच रक्तदानाला महादान आणि सर्वोत्तम दानाची उपमा देण्यात आली आहे. राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवत असताना प्रत्येक तंदुरुस्त नागरिकाने रक्तदान हे आपले प्रथम कर्तव्य मानून रक्तदान करण्याची गरज आहे. रक्तदानाने एक जीव वाचविल्याचे समाधान रक्तदात्याला लाभते. त्यामुळे रक्दानाच्या या महायज्ञात अधिकाधिक नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘लोकमत’तर्फे करण्यात आले आहे, तसेच ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सहभागी होणाऱ्या संस्था किंवा संघटनांना रक्तदान शिबिर आयोजित करण्यासाठी ८५३०६१९९९४ या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.