नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांच्या रक्ताच्या चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्यावा लागतात. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना आर्थिक झळ सोसावी लागते. आता, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध होणार असून, पीपीपी तत्त्वावर प्रयोगशाळा उभारून मनपाने चाचण्यांसाठी ठरवून दिलेले दर आकारले जाणार आहेत. महापालिकेच्या कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागेत सुसज्ज लॅब उभारण्याच्या प्रस्तावास स्थायी समितीने सोमवारी (दि.२२) मंजुरी दिली. महापालिकेच्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालय, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय, कथड्यातील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालय आणि सिडकोतील श्री स्वामी समर्थ रुग्णालयात कार्यरत पॅथॉलॉजी लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्ट उपलब्ध नसल्याने रुग्णांना रक्ताच्या अनेक चाचण्या बाहेरील खासगी लॅबमधून करून घ्याव्या लागतात. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. त्यासाठी वैद्यकीय विभागाने मनपाच्या रुग्णालयातील प्रयोगशाळांमध्ये दैनंदिन होणाºया रक्ताच्या चाचण्या वगळून इतर आवश्यक त्या रक्ताच्या सर्व प्रकारच्या चाचण्या पीपीपी तत्त्वावर करून घेण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवला होता. या प्रस्तावानुसार, महापालिकेने संबंधित एजन्सीस प्रयोगशाळेसाठी आवश्यक तेवढी जागा दवाखान्यात उपलब्ध करून द्यावी आणि अन्य दवाखान्यांमध्ये रक्ताचे नमुने घेण्यासाठी टेबल उपलब्ध करून द्यावे. सदर जागेत एजन्सीने प्रयोगशाळा उभारून ज्या चाचण्या मनपा रुग्णालयात होत नाहीत त्या मनपाच्या वैद्यकीय विभागाने निश्चित करून दिलेल्या दरामध्ये करून द्याव्यात आणि एजन्सीने मनपाला जागेचे भाडे अदा करावे. त्यानुसार, महापालिकेने निविदाप्रक्रिया राबविली आणि त्यासंबंधीचा प्रस्ताव सोमवारी (दि.२२) स्थायी समितीच्या मंजुरीसाठी ठेवला होता. स्थायीने प्रस्तावाला मंजुरी दिल्याने आता मनपाच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात प्रयोगशाळा उभारली जाणार असून, रक्ताच्या सर्व प्रकारच्या ३२१ चाचण्या करणे सुलभ होणार आहे. त्यासाठी बाहेरील खासगी लॅबमध्ये जाण्याची गरज भासणार नाही.मनपा रुग्णालयांतील रुग्णांचे रक्तनमुने घेऊन याठिकाणी चाचण्या केल्या जाणार आहेत व तसा अहवाल त्या-त्या रुग्णालयांमध्ये पाठविला जाणार आहे. मनपाला मिळणार उत्पन्न महापालिकेकडून सदर काम हे मिलेनियम स्पेशल लॅब प्रा. लिमिटेड या संस्थेला देण्यात आले असून, त्यांना प्रयोगशाळेसाठी डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ७५० स्क्वे. फूट जागा दहा वर्षांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सदर जागेपोटी महापालिकेला दरवर्षी जीएसटीसह १९ लाख ९७ हजार ६२२ रुपये भाडे मिळणार आहे. याचबरोबर, रक्ताच्या चाचण्यांचे दर वैद्यकीय विभाग निश्चित करून देणार असून, या दरामध्ये दर दोन वर्षांनी १० टक्के वाढ केली जाणार आहे.
मनपा रुग्णालयांत होणार रक्ताच्या चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 1:10 AM