नाशिक : शहरामध्ये मागील दहा दिवसांपासून खुनाची मालिका सुरूच आहे. वारंवार घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे नाशिक हादरून गेले आहे. या आठवड्यात खुनाची सहावी घटना शनिवारी (दि.२८) मध्यरात्री घडली. वाद मिटविण्यासाठी मध्यस्ती करण्यासाठी गेलेल्या युवकावर धारधार शस्त्राने हल्लेखोरांनी वार केला. घाव वर्मी लागल्याने जखमी सागर प्रकाश रावतर (२०,रा. शिवाजीवाडी, वडाळारोड) याचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. याप्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी तीस संशयित हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत.
वडाळारोडवरील शिवाजी वाडी झोपडपट्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास प्रेमसंबंधाच्या संशयावरून दोन कुटुंबांत वाद उफाळून आला. या वादाप्रसंगी हाणामारीत सागरला संशयित भरत भोये, गौतम भोये, गणेश भोये या तिघा सख्ख्ये-चुलत भावंडांनी मारहाण केली. यावेळी एकाने त्याच्याजवळ असलेल्या शस्त्राने छातीवर जोरदार वार केला. वार खोलवर लागल्याने सागर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यास उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. घटनेची माहिती मिळताच मुंबईनाका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासचक्रे फिरवून तिघा संशयित मारेकऱ्यांना बेड्या ठोकल्या. यामुळे तणावाचे वातावरण काही प्रमाणात निवळण्यास मदत झाली. सकाळी जिल्ह्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक तथा प्रभारी पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील, सहायक आयुक्त दीपाली खन्ना, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले आदींनी घटनास्थळी भेट देत परिसराची पाहणी केली. दिवसभर शिवाजीवाडी परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
---इन्फो---
नाशकातील खुनाच्या घटना अशा....
१) पतीने पत्नीच्या डोक्यात हाणला फावडा- १६ मे
२) हल्लेखोरांनी युवकावर भोसकले - १८ मे
३) वडिलांनी मुलाचा उशीने झोपेत दाबले नाक-तोंड- १८ मे
४) युवकावर वार करून फेकले नदीत- १९ मे
५) दुचाकीस्वारांकडून पादचाऱ्यावर शस्त्राने हल्ला- २० मे