येवला : येथील कै. सुभाषचंदजी पारख नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून संस्थेवर प्रशासक म्हणून येथील सहायक निबंधक प्रताप पाडवी यांची सहा महिन्यांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.संचालक मंडळाचे संस्थेच्या व सदस्यांच्या हितास बाधा पोहोचविणारे कामकाज, गंभीर व नियमबाह्य वित्तीय बाबी आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत सदर संस्थेची कायदेशीर तपासणी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, असे निर्देश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले होते. तर विविध तक्रारींवरून सहकार विभागाकडून वेळोवेळी बैठका व चौकशीची प्रक्रिया राबविण्यात आली होती; मात्र वेळोवेळी सूचना देऊनही व्यवस्थापन समितीने जबाबदारी पार पाडलेली नाही.
यासंदर्भात संचालक मंडळास उपस्थित राहून म्हणणे मांडण्याचीही संधी देण्यात आली होती.सहकार कायद्याचे उल्लंघन, सभासदांच्या व संस्थेच्या आर्थिक हिताला बाधा, पोटनियम बाह्य व मनमानी कामकाज, कर्तव्यात कसूर असे ठपके ठेवत वित्तीय नियम बाह्यबाबी व गणपूर्ती नसल्याने विद्यमान संचालक मंडळ निष्प्रभावित करून पाडवी यांची प्रशासक म्हणून नेमणूक केल्याचे जिल्हा उपनिबंधक डॉ. सतीश खरे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.गेल्या दोन वर्षापासून ठेवीदारांचे सुमारे ७० कोटी रुपये सदर संस्थेत अडकलेले असून, सुमारे १०० कोटींच्या आसपास कर्ज वसुलीदेखील रखडली आहे. यासंदर्भात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात तक्रारीदेखील संबंधित विभागाकडे झाल्या आहेत.