येवला : शहरापासून पश्चिमेकडे १४ किमी अंतरावर असणाºया महालखेडा (पाटोदा) गावातून जाणाºया नांदूरमधमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या वेगवान प्रवाहात सोमवारी बेपत्ता झालेल्या दोघा सख्या भावांचे मृतदेह हाती आले असून वडील सोमनाथ गिते यांच्यासाठी अद्यापही शोधमोहीम सुरूच आहे.येथील शेतकरी कुटुंबांतील दोन लहान भावंडासह त्यांचे वडील नांदूरमधमेश्वर एक्सप्रेस कालव्याच्या वेगवान प्रवाहात वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता घडली होती. महालखेडा परिसरातील गीते वस्तीवरून नांदूर मध्यमेश्वर एक्सप्रेस कालवा जातो. गेल्या १५ दिवसापासून या कालव्याला वेगवान प्रवाहित पाणी चालू आहे. गीते कुटुंबातील वडिलांसह दोघे मुलं आपल्या शेतात कांद्यावर फवारणीचे काम करीत होते.कार्तिक सोमनाथ गीते हा १४ वर्षीय मुलगा कांद्याच्या फवारणी पंपासाठी आवश्यक असणारे पाणी घेण्यासाठी कालव्याच्या प्रवाहाच्या कडेला गेला.पाणी घेतांना निसरड्या भागावरून त्याचा पाय घसरला. दरम्यान त्याच्या सोबतीने असणारा त्याचा लहान भाऊ सत्यम सोमनाथ गिते (११) आपल्या मोठ्या भावाला वाचवण्याच्या प्रयत्नात तो देखील मोठ्याने आवाज करीत पाण्यात झेपावला. आपली दोन्ही मुले पाण्याच्या प्रवाहात वाहत असल्याचे पाहून शेतात फवारणी करीत असलेले वडील सोमनाथ शिवराम गिते (३८) हे आपल्या मुलांना वाचवण्याच्या उद्देशाने धावत येवून प्रवाहात झेपावले.वेगवान प्रवाहात तिघेजण वाहून जात असल्याचे सोमनाथ यांचा मावसभाऊ अमोल गीते यांच्या लक्षात आले.त्यांनी या तिघांना पाण्याबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.परंतु हा पर्यंत अयशस्वी ठरला.या प्रयत्नात अमोल यांच्या पायाला दुखापत देखील झाल्याची माहिती मिळाली आहे.दोन भावंडे आणि त्यांचे वडील यांचा घटनास्थळापासून शोध घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थ, पोलीस पथक आणि संभाजी पवार यांचेसह त्यांचे कार्यकर्ते करीत आहेत.एक्सप्रेस कालव्याच्या पाण्याचा वेगवान प्रवाह असल्याने शोधकार्यात अडचणी येत होत्या. तहसीलदार नरेशकुमार बिहरम हे देखील घटनास्थळी थांबून होते.
महालखेड्यात दोघा भावांचे मृतदेह सापडले, वडिलांसाठी शोधकार्य सुरुच..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:39 PM