नाशिक : विकासाच्या नावाखाली असंवेदनशील मनाच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींनी गोदावरीभोवती कॉँक्रीटचा फास आवळला. केवळ पैशांसाठी नदीचे कॉँक्रिटीकरण करून जिवंत जलस्त्रोत मृत करून गोदावरीचा श्वास कोंडला गेला, असा आरोप जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी केला. गोदावरी प्रगट दिनानिमित्त जलबिरादरी नाशिक, कलावंतांचा जनस्थान ग्रुप व गोदाप्रेमींनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या गोदावरी संवर्धन चळवळीच्या कार्यक्रमात राजेंद्रसिंह राणा प्रमुख वक्त म्हणून बोलत होते. सिंहस्थासाठी सातत्याने गोदावरी नदीपात्राभोवती कॉँक्रिटीकरण करण्यात आले. हे कॉँक्रिटीकरण नदीच्या मुळावर उठले आहे. कोणतीही दूरदृष्टी लोकप्रतिनिधी व प्रशासनाने यावेळी दाखविली नाही. यामुळे नदीपात्रातील नैसर्गिक जिवंत जलस्त्रोत, उपनद्यांचा प्रवाह, प्राचीन कुंड बंद झाले आहे. गोदावरीचा कोंडलेला श्वास मोकळा करण्यासाठी गोदासंवर्धन चळवळीचे रणशिंग राजेंद्रसिंह राणा यांच्या उपस्थितीत कुसुमाग्रज स्मारकात सर्व तरुण कलावंत व गोदाप्रेमींनी एकत्र येऊन फुंकले. यावेळी अभिनेता सदानंद जोशी, चिन्मय उद्गीरकर, कांचन पगारे, अभिनेत्री धनश्री क्षीरसागर, प्रिया तुळजापूरकर, ऋतुजा बागवे, सुहास भोसले, धनंजय धुमाळ, गोदाप्रेमी देवांग जानी, राजेश पंडित, निशिकांत पगारे आदि उपस्थित होते. यावेळी राजेंद्रसिंह राणा म्हणाले, नदीच्या जागेमधील अतिक्रमण, कॉँक्रिटीकरणामुळे बंद झालेले जिवंत जलस्त्रोत, वाढते प्रदूषण या तीन संकटांमुळे गोदावरी धोक्यात आली आहे. यासाठी सर्वप्रथम कॉँक्रिटीकरणामधून गोदावरीची सुटका केली पाहिजे. यावेळी जानी यांनी जनहित याचिका व त्यावरील निकालाची माहिती सांगितली. प्रास्ताविक उद्गीरकर यांनी केले व सूत्रसंचालन धनश्री क्षीरसागर यांनी केले.
विकासाने कोंडला गोदामाईचा श्वास
By admin | Published: February 07, 2017 1:00 AM