नाशिक : पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पेठेनगर भागातील एका पडीक विहिरीत अज्ञात अल्पवयीन मुलाचा मृतदेह अर्धवटस्थितीत आढळून आला. मृतदेह कुजलेल्या व अर्धवट अवस्थेत असून शीर नसल्याने पोलिसांपुढे ओळख पटविण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सोमवारी (दि.११) दुपारच्या सुमारास येथील पेठेनगर रस्त्यालगत असलेल्या एका पडीक विहिरीत अंदाजे १७ वर्षे वयाच्या एका अल्पवयीन मुलाचा अर्धवट मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे येथील वॉचमनच्या लक्षात आले. त्याने तत्काळ याबाबत पोलीस ठाण्याला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह विहिरीतून बाहेर काढत शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात पाठविला. याप्रकरणी पोलिसांनी तपासाला गती दिली असून तुर्तास अकस्मात मृत्यूची नोंद पोलिसांनी केली आहे. मृतदेहाचे शीर नसल्यामुळे आणि मृतदेह किमान दोन महिन्यांपासून पाण्यात कुजल्याने ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या युवकाच्या मृत्यूमागे घातपाताचा संशयही पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. मृतदेहाचे हातदेखील नसल्याने कोणीतरी खून करून युवकाला विहिरीत तर फेकून दिले नाही ना? याबाबतही पोलीस तपास करत आहेत. विहिरीत मृतदेह आढळून आल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी गर्दी केली होती.