सटाणा : बागलाण तालुक्यातील वाघांबा शासकीय आश्रमशाळेतील दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृतदेह वाघांबा-साल्हेर घाटात आढळून आल्याने बागलाण तालुक्यात खळबळ उडाली आहे. घटनास्थळी जायखेडा पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली की त्याचा घातपात झाला याबाबत अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत.
रोशन दगडू शिंदे असे या विद्यार्थ्याचे नाव असून तो मानूरच्या महारदरचा रहिवासी आहे. त्याच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दगडू शिंदे यांची दोन मुले आणि एक मुलगी वाघांबा शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. दगडू शिंदे हे आपल्या मुलांना भेटण्यासाठी बुधवारी (दि.९) आश्रमशाळेत गेले असता दहावीत शिकणारा रोशन शिंदे तीन दिवसांपासून आश्रमशाळेत नसल्याचे त्यांना सांगण्यात आले.
शिंदे यांनी आपल्या नातेवाईक यांच्यासह इतरत्र शोध घेतला असता गुरुवारी सायंकाळी सहा वाजता रोशन शिंदे याचा मृतदेह जुन्या चिकार हॉटेलच्या दरीत सापडला आहे. मयत शिंदे याचा मृतदेह गुजरात हद्दीत येत असल्याने जायखेडा पोलिसांना गुजरात पोलिसांची मदत घ्यावी लागणार असून बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी डांग जिल्ह्याचे आमदार विजय पटेल यांच्याशी संपर्क साधून डांग पोलिसांना जायखेडा पोलिसांशी सहकार्य करून तपास करण्याची विनंती केली आहे.