लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : जेलरोडयेथील कैलासजी सोसायटीतील एका फ्लॅटमध्ये कुजलेल्या अवस्थेतील महिलेचा मृतदेह आढळून आला. सदर मृतदेहाची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले असून, शीतल जगताप (३५) रा. श्रमनगर, उपनगर या महिलेचा मृतदेह असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी संशयित विजय गव्हाणे याला उपनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जेलरोड भीमनगर येथील कैलासजी सोसायटीतील सी-१ इमारतीतील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक ८ मध्ये विजय नारायण गव्हाणे (वय ३५) हा युवक एकटाच राहतो. खासगी ठिकाणी सुरक्षारक्षकांचे काम करणाऱ्या विजयला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे त्याची पत्नी त्याला ७-८ वर्षांपूर्वीच सोडून माहेरी गेली आहे, तर त्याचा भाऊ सचिन हा बहीण व मेहुण्यांच्या घरी राहाण्यास आहे. विजय याचा भाऊ सचिन हा सोमवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास विजयच्या घरी जेवणाचा डबा घेण्यास आला होता. विजयने दरवाजा खोलताच सचिनला घरातून उग्र वास येऊ लागल्याने त्याने घरात शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र मद्यधुंद अवस्थेत असलेल्या विजयने त्यास विरोध केला. मात्र सचिनने त्याला बाजूला करीत घरात डोकावले असता किचनमध्ये मृतदेहाबरोबर घरातच वास्तव्य मृत महिलेच्या डोक्यावर प्रहार करण्यात आल्याने रक्तस्त्राव होऊन तिचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. मृतदेहाच्या अवस्थेवरून तीन ते चार दिवसांपासून मृतदेह घरातच दडवून ठेवण्यात आला असावा असाही अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. दरम्यान, मयत महिलेची ओळख पटविण्यास पोलिसांना यश आले असून, तिच्या फोन कॉल डिटेल्सवरून दोघांची ओळख असल्याचे समोर आले आहे. जेलरोड कैलासजी सोसायटीतील सी-१ या इमारतीतील वर्तुळात दाखविलेल्या फ्लॅटमध्ये एका युवतीचा कुजलेला मृतदेह मिळून आला.