नाशिकरोड : बिटको महाविद्यालयातील प्रथम वर्ष एफ.वाय.च्या ४१ विद्यार्थ्यांच्या बोगस गुणपत्रिका संस्थेने रद्दबातल ठरविण्यात आल्या आहेत. या प्रकरणात गुंतलेल्या दोघा कनिष्ठ लिपिकाविरूद्ध कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आली आहे.बिटको महाविद्यालयात प्रथम वर्ष एफ.वाय.चा आॅनलाइन निकाल गेल्या १० जून रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर काही दिवसांनी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देताना जे काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले होते त्यापैकी काही जणांना उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका देण्यात आल्या होत्या. आॅनलाइन निकालात अनुत्तीर्ण झालेल्या काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिका व गुण तपासणीसाठी पुनर्तपासणी अर्ज महाविद्यालयाकडे दाखल केला होता. त्यांचा निकाल जाहीर नसतांना देखील पुनर्तपासणीकरिता अर्ज केलेल्या काही विद्यार्थ्यांनी द्वितीय एस.वाय. च्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी कागदपत्रे सादर केली होती. त्यावरून महाविद्यालयाच्या संगणकाच्या मुळ डाटामध्येच फेरफार करून अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका देण्यात आल्याचे उघडकीस आले. विद्यार्थ्यांची आर्थिक सौदेबाजी करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण झाल्याच्या गुणपत्रिका दिल्याचे बिंग फुटले. या घटनेची गंभीर दखल घेत महाविद्यालयाने सात जणांची चौकशी समिती नेमली होती. त्या चौकशी समितीने विद्यार्थ्यांच्या मूळ गुणपत्रिका तपासल्या. तसेच संगणकामध्ये केलेल्या फेरफार प्रकरणाची चौकशी करून संस्थेकडे अहवाल काही दिवसांपूर्वीच सादर केला होता. संस्थेने अहवालावरून ४१ विद्यार्थ्यांच्या बोगस गुणपत्रिका रद्दबातल ठरविल्या आहेत. बोगस गुणपत्रिकेद्वारे द्वितीय एस.वाय. च्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश देखील रद्द केले आहेत. विद्यार्थ्यांनी येत्या मंगळवारपर्यंत त्या बोगस गुणपत्रिका महाविद्यालयाकडे जमा करून त्यांनी त्यांच्या खऱ्या गुणाच्या गुणपत्रिका घेऊन जाण्याची नोटीस महाविद्यालयाने काढली आहे. बोगस गुणपत्रिकेच्या आधारावर एस.वाय.च्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश शुल्कदेखील पुन्हा विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे. खऱ्या गुणपत्रिकेच्या आधारावर एटीकेटी मध्ये बसणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र द्वितीय वर्गात प्रवेश दिला जाणार आहे. महाविद्यालयाने या संदर्भात त्या ४१ विद्यार्थ्यांची नावांची नोटीस बोर्डावर लावली आहे. (प्रतिनिधी)
बोगस गुणपत्रिका : दोघांना नोटिसा
By admin | Published: July 17, 2016 1:43 AM