मेशी : देवळा तालुक्यातील मेशी या सांस्कृतिक वारसा लाभलेल्या गावाचे आराध्य दैवत जगदंबामाता या देवतेची यात्रा आजपासून सुरू झाली आहे. यानिमित्ताने आठ बोहाडा असतो. तीन दिवस लोकनाट्य तमाशा आहे. त्यानंतर पाच दिवस रामायणातील रामलीला सुरू होते. गावातल्या आकर्षक मंदिरात जगदंबामाता मूर्ती आहे. याशिवाय विविध देवदेवतांच्या आकर्षक मूर्ती आहेत. याकरिता मंदिराची सजावट करण्यात आली आहे. बोहाडा उत्सवात गावातील कलाकार सहभागी होतात. सतराव्या शतकात बोहाडा परंपरा सुरू आहे. या काळात गावात मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. रात्री उशिरापर्यंत बोहाडा सुरू असताना काही हौशी तरुण पंचाहत्तर किलो वजनाचा दगड उचलण्याची स्पर्धा खेळतात. मागील वर्षी हे दैवत क दर्जा या स्वरूपात तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. यासाठी आमदार डॉ. राहुल अहेर, केदा अहेर, केदा शिरसाठ यांनी विशेष लक्ष दिले. अक्षयतृतीयेला सकाळी बारागाड्या ओढून सोहळ्याची सांगता होईल. गावातील देवी भक्त छगन शिरसाठ बारागाड्या ओढतात. या काळात दररोज रात्री गाववेशीवर तेल जाळले जाते. रामायणातील विविध देवतांची मुखवटे धारण करून सोंगे नाचविली जात आहेत. संबळ वाद्यांच्या विशिष्ट प्रकारच्या चालीवर सोंगे कलाकार नाचवितात. यासाठी सर्व गावकरी एकोप्याने एकत्र येऊन काम करतात. सगळे राजकारणी प्रतिनिधी एकदिलाने काम करतात. बऱ्याच ठिकाणी बोहाडा बंद झाला आहे; मात्र मेशी या गावातील नागरिकांनी ही परंपरा कायम ठेवली आहे. याकाळात आजूबाजूच्या गावातील नागरिक देवीदर्शनासाठी आणि बोहाडा पाहण्यासाठी गर्दी करतात. (वार्ताहर)
जगदंबामाता यात्रोत्सवानिमित्त बोहाडा
By admin | Published: April 21, 2017 11:43 PM