बाळासाहेब कुमावत।लोकमत न्यूज नेटवर्कपाथरे: निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्याचा अधिकार प्रत्येकाचा आहे. मग त्यात पशू, पक्षी, प्राणी सर्व येतात. परंतु कधी कधी मानव मात्र अडमुठेपणाची भूमिका घेत असतो तर कधी त्याला निसर्गाशी समायोजन करावे लागते. पशू पक्षांशिवाय मानवी जीवन व्यर्थ आहे म्हणून त्यांचे संगोपन करणे गरजेचे आहे. सिन्नर तालुक्यातील देवपूर शिवारातील शेतकºयाने पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारी अंडी वाचवून ती उबवून त्यातून पाच पिल्लांना जन्म देवून त्यांचे केलेले संगोपन चर्चेचा विषय बनली आहे.पशु पक्षांचे पर्यावरणातील स्थान अत्यंत महत्वाचे आहे. प्राणी प्रेमी हे उन्हाळ्याच्या दिवसात अनेक पक्षी, प्राणी यांची अन्न, पाण्याची व्यवस्था करताना दिसतात. वादळी वाºयात होत असलेल्या पावसामुळे सर्व पशु पक्षी हे सुरक्षित जागेचा शोध घेत असतात अशावेळी त्यांनी घातलेली अंडी, पिल्ले यांना मात्र सोबत घेऊन सुरक्षित ठिकाणी त्यांना जाताच येते असे नाही. अशीच घटना गेल्या पावसाळ्यात सिन्नर तालुक्यातील देवपूर जवळील डांबरनाला शिवारात घडली. यावेळी जोरदार पावसामुळे पशु पक्षांची मोठी वाताहत झाली होती. त्यांना आश्रय मिळत नव्हता. या पावसात लांडोराने घातलेली जवळपास पाच अंडी पाण्याबरोबर वाहून जात होती.देवपूर डांबरनाला परिसरातील नाना पिंपळे यांच्या ते निदर्शनास आले. ती अंडी कोणत्या पक्षाची आहे हे मात्र त्यांना ओळखता आले नाही. परंतु यात जास्त वेळ न घालवता त्यांनी पाचही अंडी वाहत्या पाण्यातून सहीसलामत बाहेर काढली. परिसरात राहणाºया मोरांचे अंडी आहेत हे लक्षात आल्यावर पिंपळे यांनी ती पाच अंडी कोंबडी खाली उबवण्याचे ठरवले कारण प्रत्येकाला जगण्याचा हक्क आहे हा निसर्गाचा नियम आहे. कोंबडीच्या सहाय्याने उबविलेल्या त्या अंड्यांतून काही दिवसांनी पाच मोरांच्या पिलांनी जन्म घेतला. मोरांना जीवनदान मिळाले. आज ही पाचही मोर परिसरातील इतर मोरांबरोबर मुक्तपणे संचार करतात. तर कधी कोंबडयांबरोबर फिरत राहतात. परंतु त्यांना माणसांचा लळा लागलेला असल्यामुळे ते शेतात काम करणाºया शेतकºयांच्या शेजारी बिनधास्त पणे बसतात. आई विना पोरके झालेले ते मोर जीवंत आहेत याचे श्रेय नाना पिंपळे यांना जाते. त्यांना पर्यावरण प्रेमी सोपान गडाख यांनी मोरांच्या पिल्लांची काळजी कशी घ्यावी याचे वेळोवेळी मार्गदर्शन केले. सदर पिल्ले तीन महिन्यांची झाली आहेत. हे दोघे या लहान पिलांचे संगोपन करत आहेत. तसेच कुत्रे, रानटी जनावरे यापासून पिल्लांचे संरक्षणही करत आहे. मोरांची अन्न व पिण्याचा पाण्याची उत्तम व्यवस्थाही त्यांनी केली आहे. हे मोर कितीही बाहेर गेले तरी पिंपळे आणि गडाख यांच्या जवळ ते आश्रयासाठी येतातच कारण आता त्यांना एकमेकांचा लळा लागला आहे. पशू पक्षी उपकार विसरत नाही हेच खरे.
पाच जीवांसोबत उबवली माणुसकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 4:12 PM