येवला : गावातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी तालुक्यातील बोकटे ग्रामस्थांनी पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.बोकटे येथील कोरोना समितीच्या वतीने शनिवारी (दि.१७) सायंकाळी रात्री ८ वाजेपर्यंत घरातील फक्त एकाच व्यक्तीने गर्दी टाळून किराणा, पिठाच्या गिरण्या व इतर अत्यावश्यक सेवा पूर्ण करून घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर गावातील सर्व दुकाने गुरुवार (दि.२२) पर्यंत पूर्णवेळ बंद ठेवण्यात येणार असल्याचे जाहीर केले गेले.गावातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तहसीलदार प्रमोद हिले, गटविकास अधिकारी डॉ. उमेश देशमुख, तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. ग्रामस्थांच्या आरोग्य हितासाठी कोरोना समिती बैठकीत पाच दिवस गावबंदचा निर्णय घेण्यात आला. बैठकीस विस्तार अधिकारी यादव, सरपंच प्रताप दाभाडे, ग्रामसेवक भाऊराव मोरे, तलाठी अश्विनी शेंडे, पोलीस पाटील सुरेश दाभाडे, सर्जेराव बागल, पोपट दाभाडे, विजय दाभाडे आदी उपस्थित होते.