नाशिक : बोलावा विठ्ठल..., पहावा विठ्ठल..., देवा माझे मन लागे तुझे चरणी..., भेटी लागी जीवा, लागलीस आस..., यांसारख्या एकापेक्षा एक सरस अभंग, भजनांच्या सुरेल गायन व वाद्यवृंदांनी केलेल्या उत्तम साथसंगतीने मैफल उत्तरोत्तर रंगलेल्या भजन संध्येत उपस्थित श्रोते भक्तिरसात न्हाऊन निघाले. सदगुरू नारायण सांस्कृतिक अधिष्ठानच्या वतीने परशुराम सायखेडकर सभागृहात ‘भजन महोत्सव’ मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अर्थतज्ज्ञ व श्रीगुरूजी रुग्णालयाचे अध्यक्ष विनायक गोविलकर उपस्थित होते. गोविलकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मैफलीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी अधिष्ठानचे अध्यक्ष श्रीकृष्ण चंद्रात्रे उपस्थित होते. प्रारंभी कनकलता नृत्यालयच्या वतीने गुरूवंदना सादर करण्यात आली. ‘नृत्यशारदा’च्या विद्यार्थिनींनी श्लोक व हरिचिया भक्ता नाही भयचिंता या अभंगावर भरतनाट्यम्चा नृत्याविष्कार सादर केला. अधिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी रामकृष्ण हरीचा जागर व भगवान श्रीकृष्णाची कव्वाली सादर केली. सरस्वती संगीत विद्यालयाच्या एकूण १७ गायक महिलांच्या समूहाने बंगाली भजन सादर करून उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळविली. स्वर रजनी ग्रुपने मराठी अभंग देवा माझे मन..., मुक्ताई भजनी मंडळाच्या वतीने अपूर्वा क्षीरसागर हिने बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल... हे अभंग सुरेल आवाजात सादर करुन ‘वन्स मोअर’ मिळविला. प्रेक्षकांनी वन्स मोअरची मागणी करताच क्षीरसागर हिने ‘आम्ही बिघडलो, तुम्ही बिघडा ना..’ हे भजन सादर करुन उत्स्फूर्त दाद मिळविली. श्रोत्यांनी टाळ्यांच्या कडकडाटाने त्यांच्या सादरीकरणाला दाद दिली. त्यानंतर रंगीलो राजस्थान महिला मंडळाने संत कबीरदास यांची रामधून लागी, गोपाल धुन लागी ही रचना खास शैलीत सादर केली. तसेच पुष्पांजली माहेश्वरी मंडळाच्या चंद्रकला भुतडा व त्यांच्या सहकाऱ्यांनी मारवाडी भजनाचे गायन केले. यांच्यासह एकूण तेरा भजनी संघांनी या महोत्सवामध्ये सहभाग नोंदविला. (प्रतिनिधी)
बोलावा विठ्ठल...पहावा विठ्ठल...
By admin | Published: January 23, 2017 12:23 AM