नाशिक : पावसाच्या सरीनंतरची रम्य सायंकाळ, मनाचा ठाव घेणाऱ्या जुन्या-नव्या गाण्यांवर आबालवृद्ध कलाकारांकडून सादर होत असलेली नृत्ये, त्याला टाळ्या-शिट्यांच्या गजरात मिळत असलेला प्रतिसाद यामुळे श्रोते भारावून गेले होते. निमित्त होते जनस्थान फेस्टिव्हल अंतर्गत ‘रेट्रो ते मेट्रो’ कार्यक्रमाचे. शनिवारी (दि.२३) सायंकाळी परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. गणेशवंदनेने कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर नाशिकमधील नवोदित ते ज्येष्ठ नामवंत कलाकारांनी विविध हिंदी गीतांवर प्रभावी नृत्ये सादर केली. वेशभूषा, केशभूषा, नृत्याची कोरिओग्राफी या साºया गोष्टी वाखाणण्याजोग्या होत्या. प्रारंभी दीपक करंजीकर, विद्या करंजीकर यांनी ‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे नृत्य सादर केले. नृत्यांच्या दरम्यान चार स्कीटही सादर करण्यात आली. कार्यक्रमा दरम्यान पुरस्कारही देण्यात आले. प्रसिद्ध आरजे भूषण मटकरी यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. त्यांनी आपल्या निवेदनात प्रत्येक गाण्याची पार्श्वभूमी, इतिहास, ते गाणे सादर करणाºया कलाकारांचे आयुष्यातील गमतीशीर किस्से आदींची माहिती दिली. सर्व नृत्यांचे दिग्दर्शन सचिन शिंदे यांनी केले होते. कार्यक्रमास नाशिककर रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.विविध गीतांवर नृत्य सादरसदानंद जोशी, हेमा जोशी यांनी ‘भोली सुरत’, अविराज तायडे, श्रेया जोशी यांनी ‘सर जो तेरा चकराये’, कांचन पगारे यांनी ‘हम काले है तो क्या हुआ’, सी.एल. कुलकर्णी, माधुरी कुलकर्णी यांनी ‘आज कल तेरे मेरे’, लक्ष्मी पिंपळे यांनी ‘पिया तु अब तो आजा’, विनायक रानडे यांनी ‘कभी किसीसे प्यार किया’, कैलास पाटील, शीतल सोनवणे यांनी ‘जय जय शिव शंकर’, भूषण मटकरी, नूपुर सावजी यांनी ‘चुम्मा चुम्मा दे दे’, कीर्ती भवाळकर यांनी ‘पिया बावरी’, मोहन उपासनी यांनी ‘डिस्को डान्सर’, सुमुखी अथनी यांनी ‘मोरनी बागामा बोले’, सुहास भोसले यांनी ‘मुन्नाभाई एमबीबीएस’, संजय गिते, प्रिया तुळजापूरकर यांनी ‘धिनाधीन’, विद्या देशपांडे यांनी शास्त्रीय नृत्य, पीयूष नाशिककर यांनी ‘बरदाश नही करता’ आदी विविध गीतांवर सुंदर नृत्य सादर केले.
जनस्थान कलाकारांनी घडविली बॉलिवूड सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:25 AM