नाशिक: भारतीय तोफखान्याच्या ताफ्यात सहा महिन्यांपुर्वीच दाखल झालेली स्वदेशी अत्याधुनिक हायड्रोलिक धनुष तोफेसह के-९वज्र, अल्ट्रा लाइट होवित्झर, बोफोर्स यांसारख्या शक्तीशाली नऊ तोफांनी शत्रुच्या तळांवर एकापाठोपाठ बॉम्बगोळे डागत भारतीय सैन्याच्या पाठीचा कणा असलेल्या आर्टीलरीची क्षमता व शक्तीचे जोरदार प्रदर्शन केले. नाशिकच्या देवळाली गोळीबार मैदानावर रविवारी (दि.२९) झालेल्या युद्धभुमी अभ्यासांतर्गत सादर करण्यात आल्या तोफांच्या प्रात्याक्षिकांनी शत्रुच्या उरात धडकी भरविली.
नाशिकमधील देवळाली कॅम्प येथे स्कुल ऑफ आर्टिलरीकडून तोफांचे युद्धजन्य प्रात्याक्षिक सालाबादप्रमाणे यावर्षीही आयोजित करण्यात आले होते. गोळीबार मैदानात स्कुल ऑफ आर्टीलरीचे कमान्डंट तथा रेजिमेंट ऑफ आर्टीलरीचे कर्नल कमान्डंट अति विशिष्ट सेवा मेडल लेफ्टनंट जनरल एस हरिमोहन अय्यर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या युद्धजन्य प्रात्याक्षिक सोहळ्याला नाशिकरोड येथील तोफखाना केंद्र कमान्डंट ब्रिगेडियर ए.रागेश, नाशिकचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. बी.जी.शेखर पाटील आदी लष्करी अधिकारी उपस्थित होते.
आत्मनिर्भर भारत’द्वारा प्रेरित होऊन स्वदेशी निर्मित वज्र, धनुष, उखळी मारा करण्याची क्षमता असलेली आधुनिक हलकी होवित्झर (एम-७७७), इंडियान फिल्ड सॉल्टम (१५५ एम.एम) यांसह आधुनिक बोफोर्स, १०५ एम.एम हलकी तोफ, १३०एम.एम उखळी तोफ, पिनाका मल्टी बॅरल रॉकेट लॉन्चर अशा नऊ तोफांद्वारे युद्धभूमीवरील प्रत्यक्ष थरार देवळाली गोळीबार मैदानावर अनुभवयास आला. या तोफांनी अवघ्या काही सेकंदात निश्चित केलेले लक्ष्य अचूकपणे भेदले.
‘हम भी किसीं से कम नही'उत्तम संवादकौशल्य, चोख नियोजन अन् सुक्ष्म अभ्यास व शास्त्रशुद्ध प्रशिक्षणाच्या जोरावर स्कुल ऑफ आर्टीलरीच्या ‘तोपची’ सैनिकांनी या युद्धअभ्यासप्रसंगी ‘हम भी किसीं से कम नहीं’ हे पुन्हा एकदा सिद्ध केले. यावेळी मित्र राष्ट्र नेपाल सैन्याचेही अधिकारी, जवान तसेच पुणे येथील डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ प्रशिक्षण संस्थेचे प्रशिक्षणार्थी, अधिकारी उपस्थित होते.
आत्मनिर्भर भारत, स्वदेशी निर्मित तोफांच्या भेदक माऱ्याचे प्रदर्शन यावर्षी दाखविण्यात आले.नव्याने मिळालेल्या स्वदेशी धनुष तोफेमुळे आर्टिलरीचे बळ अधिक वाढले आहे. देशाच्या आर्टिलरीच्या पाच रेजिमेंटमध्ये या वर्षभरात धनुष तोफ पोहचलेली असेल. भविष्यातील कोणतेही बिकट संकट व आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय सेना व आर्टीलरीचे तोपची सक्षम आहे. ॲडव्हान अद्ययावत तोफा ज्या ५१किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता ठेवतात त्या या वर्षअखेर आर्टीलरीला मिळतील. - लेफ्टनंट जनरल एस.हरिमोहन अय्यर, कमान्डंट, स्कुल ऑफ आर्टिलरी